Maratha Vs OBC : जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी ( Maratha Vs OBC ) करण्यात आली. त्यावेळी मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये मोठी घोषणाबाजी ( Maratha Vs OBC ) करण्यात आली. वडीगोद्री येथून मनोज जरांगे समर्थकांच्या गाड्या जात होत्या, त्यावेळी आमच्या गाड्या का अडवून ठेवल्या आहेत? त्यांच्या कशा सोडता असा प्रश्नही ओबीसी आंदोलकांनी पोलिसांना विचारला.
लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांचं उपोषण स्थळ जवळच
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं आहे. तर मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी. आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषण करत आहेत. तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. दोन्ही समाजाचे कार्यकर्ते जमले, त्यांनी घोषणाबाजी ( Maratha Vs OBC ) केली त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. वडीगोद्रीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलेलं नाही. मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र मनोज जरांगेंनी ऐकून घेतलेलं नाही. दुसरीकडे वडीगोद्री गावात लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण दिलं जाऊ नये ही त्यांची भूमिका आहे. मनोज जरांगेंनी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि समाजाला आरक्षण द्या अशी मागणी केली आहे. सरकारने अल्टिमेटम देऊनही त्यांची मागणी मान्य न केल्याने मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत.
हे पण वाचा- सकल मराठा समाज – मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून आमने-सामने
लक्ष्मण हाकेंसह तिघांचं उपोषण सुरु
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी ओबीसी समाजासाठी आंदोलन सुरु केलं आहे. तसंच त्यांच्याबरोबर वकील मंगेश ससाणे हेदेखील उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षण हे ओबीसीतून दिलं जाऊ नये अशी मागणी या तिघांनीही केली आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजाचे आंदोलक हे आंतरवली सराटीत दाखल होत आहेत. आंतरवली सराटीला जाण्याचा रस्ता वडीगोद्रीतूनच जातो. मराठा आंदोलकांच्या गाड्या याच गावातून आंतरवलीच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे दोन्ही समाजाच्या आंदोलकांमध्ये घोषणाबाजी ( Maratha Vs OBC ) होताना दिसते आहे. परिस्थिती चिघळू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
मंगेश ससाणे यांनी गॅझेट दाखवत काय म्हटलं आहे?
मनोज जरांगे मागणी करत असलेले गॅझेट ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी समोर आणले आहे. अंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषणाला बसलेले मंगेश ससाणे यांनी पत्रकार परिषद घेवून काही गॅझेट दाखवलं. त्यात त्यांनी हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट दाखवत मराठे हे क्षुद्र नसून क्षत्रिय आहेत, लढवय्ये आहेत. असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मराठे हे सामाजिक मागासलेले नसताना जरांगे गॅझेटमधील चुकीची माहिती देत आहेत आणि त्यांचं ऐकूण सरकार हे गॅझेट लागू करण्याच्या हालचाली करत आहे. त्यामुळे सरकारने या गॅझेटचाही अभ्यास करावा त्यांच्याकडे हे गॅझेट नसतील तर आम्ही त्यांना पोस्टाने पाठवू पण आम्हाला अडाणी समजू नका अशी प्रतिक्रिया मंगेश ससाणे यांनी दिली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd