धाराशिव : सरकार कोणाचेही आले तरी आरक्षण घेणारच. त्यासाठी पुढील कार्यक्रमाचे नियोजन सुरु आहे. आता सामूहिक आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरवली सराटीसह प्रत्येक घरात हे उपोषण केले जाईल. समाजाचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. कदाचित यावेळी मुंबई येथे आझाद मैदानावर असू शकेल, अशी जाहीर घोषणा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली. विधानसभा निवडणुकीत फॉर्म्युला जुळला नाही अन्यथा सुपडा साफ केला असता, अशा शब्दांत त्यांनी राजकीय टिप्पणीही केली.
जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथून रविवारी तुळजापूर आणि पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते. धाराशिव जिल्ह्यात त्यांचा ताफा दाखल होताच ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरक्षणाची यापुढील लढाई सामूहिक आमरण उपोषणाने केली जाईल. कदाचित हे उपोषण मुंबई येथे आझाद मैदानावरही होऊ शकते. आता आरक्षणाची ही चळवळ थांबवणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मराठा समाजाशिवाय कोणाचीही सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यावेळी मराठा समाजाने मोठ्या संख्येने ओबीसी आमदारही निवडून आणले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान फॉर्म्युला जुळून आला नाही. अन्यथा सुपडा साफ केला असता. मराठा आरक्षणासाठी इथून पुढे सामूहिक आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे जाहीर करुन सरकार कोणाचेही असो, मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार. त्यासाठी मुंबई येथे आझाद मैदानावरही आंदोलन करण्याची वेळ आल्यास मागे हटणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
दरम्यान, जरांगे पाटील यांचा ताफा जिल्ह्यात दाखल होताच महामार्गावरील विविध गावांत त्यांचे फुलांची उधळण करुन स्वागत करण्यात आले. तीर्थक्षेत्र तुळजापुरात मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिरापर्यंत मराठा समाजबांधवांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत उत्स्फुर्त रॅली काढली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाला.