गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे पाटलांनी आज स्थगित करून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने मागितल्याप्रमाणे एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर, आज (१४ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्युस पिऊन त्यांनी १७ दिवसांचं उपोषण सोडलं. उपोषण सोडलं असलं तरीही मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्रच्या मागणीसाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. त्यांच्याया मागणीवर भाजपा नेते नारायण राणे यांनी आक्षेप घेतला आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण न देता आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
काय म्हणाले नारायण राणे?
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले नकोत. हा निर्णय घेताना राज्य सरकारने घटनेतील कलम १५ चा अभ्यास करावा. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले मराठा समाजाचे जे लोक आहेत त्यांना आरक्षण द्यावं. सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा >> मनोज जरांगेंच्या ‘या’ मागणीला नारायण राणेंचा विरोध, “९६ कुळी मराठ्यांना सरसकट कुणबी…”
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ही आमची मागणी आहे. कुणबी जात प्रमाणपत्र घ्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. या आरक्षणामुळे गोरगरीब मराठा समाजातील पोराचं कल्याण होणार आहे. ज्यांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण लागतं तर ते कुणबी प्रमाणपत्र काढू शकतात. हे प्रमाणपत्र घेतलंच पाहिजे, ही जबरदस्ती नाही. प्रमाणपत्र कोणी घरात आणून देणार नाहीय. तुम्ही गेलात तर ते देणार आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र लागू झालं तर कोणावरही जबरदस्ती करण्यात येणार नाही. ज्यांना आवश्यक आहे, अस्तित्व टिकवण्यासाठी मराठ्यांची गोरगरीब पोरं जातप्रमाणपत्र घेऊ शकतात. ही यामागची मूळ भूमिका आहे, असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं.