शंकरराव चव्हाण यांचा अपवाद वगळता शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख व अशोक चव्हाण या तिन्ही मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच पायउतार व्हावे लागले. हे मराठवाडय़ाचे दुर्भाग्यच आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली.
निलंगा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सत्ताधारी मंडळी स्वतच्या पदामुळे तृप्त होत नाहीत. आपली मुले, सुना, नातेवाईक यांच्या पुढच्या पिढीची बेगमी करतात. सत्तेतून केवळ संपत्ती गोळा करणे यावरच त्यांचा भर असतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना स्वतंत्र लढत असले, तरी आतून सगळे एक आहेत. तुमचे प्रश्न विधानसभेत मांडण्याचे नाटक करतात व मंत्र्यांशी सौदेबाजी करून गप्प बसतात. तुम्हाला केवळ तुमचे प्रश्न विधानसभेत विचारल्याचे सांगतात. मनसेत कोणत्याही नातेवाईकाला उमेदवारी दिली नाही व देणार नाही. गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्रातील कोणतेही प्रश्न सोडवले गेले नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना अजित पवार बेमुर्वतखोरपणाची भाषा वापरतात व आम्ही मात्र या सगळय़ा घटनांकडे पाहून हसतो. निवडणूक म्हणजे आपल्याला गंमत वाटते आहे. तुमच्या भविष्याशी हा खेळ आहे. या बाबीकडे गांभीर्याने पाहा. महाराष्ट्राचा विकास नेमका कसा करायचा? चित्रकार, खेळ, पर्यटन आदींबाबत माझ्याकडे आराखडा आहे. मला सत्ता दिली तर ५ वर्षांत राज्यातील किमान १२ लाख तरुणांना नोकऱ्या देईन, असेही ते म्हणाले.
आपणास मालमत्ता गोळा करण्याचा छंद नसल्याचा दावाही त्यांनी केला. अन्य प्रांतांतील मंडळी आपल्या प्रांताचा विचार करतात. महाराष्ट्रातील राजकीय मंडळी मात्र मराठी माणसाला वाऱ्यावर सोडतात. तुमच्या भविष्याचा विचार करणाऱ्या मनसेला एकदा संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भर उन्हात ठाकरे यांच्या सभेला तरुणांनी गर्दी केली होती.
‘शालिनी ठाकरे कोण?’
राज यांनी मनसेत कोणाही नातेवाईकाला तिकीट देणार नाही, असे सांगितले. शालिनी ठाकरे या राज यांच्या कोण? तसेच मुंबईतील कोहिनूर मिल कवडीमोल किमतीला कोणी खरेदी केली? याचीही चर्चा सभेनंतर उपस्थितांत होत होती.
‘युती-आघाडीतील पक्षांच्या साटय़ा-लोटय़ामुळेच वाटोळे’
वार्ताहर, जालना
महायुती व आघाडीतील घटकपक्षांचे साटेलोटे असल्यामुळेच महाराष्ट्राचे वाटोळे झाल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
घनसावंगी मतदारसंघातील तीर्थपुरी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, की स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, तरी राज्यातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. सत्ताधारी मंडळी अजूनही रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत प्रश्नांवर मते मागतात. जनताही विश्वास ठेवून त्यांना मतदान करते. आघाडी सरकारने जनतेच्या मूलभूत समस्यांचा पार विचका करून टाकला. काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना-भाजपची मंडळी दर ५ वर्षांनी त्याच त्या समस्या सांगून व आश्वासने देऊन मते मिळवतात. परंतु निवडून आलेल्या आमदारांना कोणी जाब विचारत नाही. निवडून येणारी मंडळी कामे करीत नाहीत, याची चीड जनतेला येत नाही. आता आलेली संधी घालवू नका आणि महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या. मग विकास काय असतो ते दाखवून देतो, असे राज यांनी जाहीर केले.
मी परदेशात जातो, तेव्हा तेथील चित्र पाहून प्रश्न पडतो, की असा विकास महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? विकासाच्या नवनवीन संकल्पना महाराष्ट्रात का राबविल्या जाऊ शकत नाहीत? महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडे विकासाची इच्छाशक्तीच नाही. नेहमीच दुष्काळ पडणाऱ्या मराठवाडय़ातील परिस्थिती बदलण्यास प्रयत्न केलेच जात नाहीत. मराठवाडय़ातील पाणीपातळी अधिक खोलवर चालली आहे. असेच चालू राहिल्यास ३०-४० वर्षांत मराठवाडय़ाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मनसेचे उमेदवार सुनील आर्दड यांचेही भाषण झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा