मराठी नाट्यगृहांची दुरावस्था कोणापासूनही लपून राहिलेली नाही. आता खुद्द कलाकारच या नाट्यगृहांची दुरावस्था सर्वांसमोर आणत आहेत. अभिनेता सुमित राघवनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत संत एकनाथ रंगमंदिराची दुरावस्था सर्वांसमोर आणली आहे. सुमितचं हे डोळे उघडणारं फेसबुर लाइव्ह सध्या बरंच चर्चेत आलं असून सत्ताधाऱ्यांनी निदान आतातरी कलाकारांची हाक ऐकावी अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्याने स्थानिक शिवसेना प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरही निशाणा साधला आहे. नाट्यगृहाच्या फरशीपासून ते अगदी संगीतसंयोजक बसतात त्या जागेची दुरावस्था त्याने या व्हिडिओतून दाखवली आहेत. मुख्य म्हणजे ज्या रंगमंचावर हे कलाकार त्यांचं नाटक सादर करणार होते त्याच्या फळ्याही तुटलेल्या असून त्यावर किडे- मुंग्या ‘स्वच्छंद’पणे फिरत असल्याचे दिसत आहे. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी हा व्हिडिओ पाहात असतील तर त्यांनी कृपया या गोष्टींकडे लक्ष द्यावं असं आवाहनही त्याने केलं आहे. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंची सत्ता असलेल्या या भागात कलाकारांनी अशी व्यथा मांडावी लागतेय, त्यामुळे सुमितने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

अतिशय वाईट परिस्थितीत असलेल्या या रंगमंदिराचं अनोखं दर्शन घडवत सुमितने या रंगमंदिरामधूनच शिवसेनेवर उपरोधिक टीका करत शिवसेना झिंदाबाद अशा घोषण्याही दिल्या आहेत. हे एक दुर्लक्षित रंगमंच असून, तिथे काम करणाऱ्यांच्या धाडसाची दादही त्याने दिलीये. १२ तासांचा प्रवास केल्यानंतर कलाकारांना या परिस्थितीत काम करावं लागतं ही दु:खदायक बाब आहे हेसुद्धा स्वानंदी टिकेकर आणि सुमित राघवन या व्हिडिओतून सांगत आहेत.

Story img Loader