Prajakta Mali vs Suresh Dhas: भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा नामोल्लेख केला होता. परळीत इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा वेगळाच परळी पॅटर्न आहे. याठिकाणी मोठ मोठ्या सेलिब्रिटी येत असल्याचे सांगून धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेतली होती. यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आता महिला आयोगाने मोठे पाऊल उचलले असून मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल, असे विधान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल केले होते. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्टही केली होती.
हे वाचा >> प्राजक्ता माळीच्या विषयावरून आमदार सुरेश धस भाजपामध्ये एकाकी; नेत्यांनी कान टोचले
त्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या एक्स अकाऊंटवर कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार श्री सुरेश धस यांनी श्रीमती माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक व बदनामीकारक विधान तसेच त्यांनंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातम्या यामुळे त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर त्याचे परिणाम होत असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
“सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून महिलेच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचवणारे असल्याने राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे”, असे महिला आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सुरेश धस म्हणाले…
दरम्यान थोड्यावेळापूर्वीच माध्यमांशी बोलत असताना सुरेश धस यांना महिला आयोग आणि प्राजक्ता माळी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. माझ्यासाठी हा विषय संपला असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
© IE Online Media Services (P) Ltd