नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचा जोरदार आटापिटा सुरू असताना अमरावती ते सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. पाच वर्षांपुर्वी या कामाला सुरूवात झाली खरी, पण भूसंपादनातील अडथळे आणि कंत्राटदारांच्या असहकार्यामुळे कामे रखडत गेली. अमरावती ते चिखली या दोनशे किलोमीटरच्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन दोन वर्षांपुर्वी करण्यात आले होते. पण, सद्यस्थितीत केवळ १० टक्केच काम पूर्ण झाले आहे.

नागपूर ते सुरत हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारासाठी महत्वाचा मानला जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चा भाग असलेल्या अमरावती ते नागपूर या महामार्गाचे चौपदरीकरण यापुर्वीच पूर्ण झाले आहे. सात वर्षांपुर्वी अमरावती ते जळगाव आणि जळगाव ते नवापूर अशा दोन टप्प्यांमध्ये या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण, नंतर या कामाचे तीन टप्पे पाडण्यात आले. त्याआधी कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून दिल्याने चौपदरीकरण रखडले होते.

अमरावती ते चिखली या १९४ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ जून २०१५ रोजी मान्यता दिली. गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम अमरावती ते चिखली १९४ किलोमीटर, चिखली-फागणे १५० किलोमीटर तर फागणे- गुजरात सीमा १४० किलोमीटर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुमारे ७ हजार ५२८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अमरावती ते चिखली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी अडीच वर्षांमध्ये हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले पण, आतापर्यंत केवळ १० टक्केच काम झाले आहे.

अडथळ्यांची मालिका

अमरावती ते नवापूर (गुजरात सीमा) या महामार्गाच्या चौपदरीकरणाला २०१२ मध्ये मंजूरी मिळाली. ४८५ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ३ हजार ९६० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. तीन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या विस्तारित मार्गासाठी  अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील सुमारे १६०९ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार होती. पण, भूसंपादन संथगतीने झाले आणि त्यामुळे किंमतही वाढली.

एल अ‍ॅन्ड टी या कंत्राटदार कंपनीला वर्षभरात महसूल विभागाने ८० टक्के जमीन संपादित करून देणे आवश्यक होते. पण निर्धारित कालावधीत जमीन ताब्यात न दिल्याने या कंपनीने वाढीव मोबदल्याची मागणी केली होती. ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि एल अ‍ॅन्ड टी यांच्यात झालेला करार मोडला गेला. त्यानंतर या कामासाठी पुन्हा निविदा काढण्यात आल्या.

चिखली ते फागणे या मार्गाच्या कामातही अडथळे निर्माण झाले. अखेर या १५० किलोमीटर रस्त्याचे काम फागणे ते तरसोद (८७ किलोमीटर) आणि तरसोद ते चिखली (६३ किलोमीटर) या दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामांच्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस दोन भागात निविदा निश्चित करण्यात आल्या. त्यासाठी दोन कंपन्या तयार झाल्या. महामार्गाच्या चौपदरीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण तयार करीत असते. त्याला विलंब झाला. अखेरीस राज्य सरकारने तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कंपन्यांसोबत करार करण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष काम येत्या ऑक्टोबरनंतरच सुरू होऊ शकेल, अशी स्थिती आहे.

अमरावती ते चिखली आणि फागणे ते गुजरात हद्द या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आले. काम सुरू असले, तरी कामे संथगतीने सुरू आहेत. कंत्राटदार कंपनी इतर छोटय़ा कंत्राटदारांची मदत घेत असते. या कंत्राटदारांसमोर अडचणी निर्माण झाल्याने कामे रखडल्याचे सांगितले जात आहे.

अमरावती ते नागपूर या १५० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होऊन तीन वर्षांहून अधिक कालावधी उलटला आहे. या महामार्गावर अपघातांचे प्रमाण पुर्वीपेक्षा बरेच कमी झाले आहे. वाहतुकीचा खोळंबा होत नाही. पण, अमरावती ओलांडल्यानंतर जळगाव- सुरतकडे जाताना अजूनही वाहनचालकांना दिव्यातून जावे लागते. अनेक ठिकाणी अरूंद पूल, वाहतुकीची कोंडी अनुभवावी लागते. महामार्ग ठिकठिकाणी खराब झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याचे सांगून दुरूस्तीकडेही लक्ष दिले जात नाही. अरूंद रस्त्यावर दुहेरी वाहतूक अपघातांना आमंत्रण देणारी ठरली आहे. अमरावतीहून पुणे येथे जाण्यासाठी वाहनचालक अकोला मार्गे चिखली या मार्गाचा वापर करीत होते. पण, खराब रस्त्यामुळे कारंजा, मेहकर मार्गे नागपूर-औरंगाबाद महामार्गाचा वळसा घेऊन जाणारा मार्ग त्यांना निवडावा लागतो. या मार्गाची स्थिती सध्या चांगली आहे. एकीकडे, समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाला वेग आलेला असताना या सर्वात जुन्या महामार्गाकडे कधी लक्ष दिले जाईल, असा प्रश्न लोकांना भेडसावू लागला आहे.

Story img Loader