एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीत संप सुरू राहिल्याने आता जागोजागीची एसटी स्थानके ओस पडू लागली आहेत तर रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नाही अशी स्थिती झाली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रवाशांची गरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहने, बसेस अधिगृहित करण्याचे गुरुवारी आदेश दिले. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
जिल्ह्यमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे. यामुळे प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी वेळेत व सुरक्षित प्रवास करण्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी अन्वये जिल्हा प्रभारी जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी बसेस, वाहने अधिग्रहीत करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ सांगली, तालुका आगार व्यवस्थापक यांची इन्सिडंट कमान्डंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांना वाहतूक व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
वाहने, बसेस अधिग्रहीत करण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- कोणत्याही खासगी वाहन कर्मचाऱ्याने प्रवाशांकडून अतिरिक्त दर आकारू नये, सर्व खासगी वाहन चालकांनी सुरक्षित प्रवासी वाहतूक करावी, सर्व खासगी वाहन चालकांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये, एस.टी. कर्मचाऱ्यांनी सदर वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास कोणताही अडथळा निर्माण करू नये. अधिग्रहीत खाजगी बसेसवर दगडफेक करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ अन्वये कारवाई करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली व विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ सांगली यांना देण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकावर आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा. तसेच तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, तालुका आगार व्यवस्थापक यांनी समन्वय राखून कार्यवाही करावयाची असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
नाडलेल्या प्रवाशांची मनमानी भाडेवसुलीतून लूट
पुणे : लक्ष्मीपूजनानंतर आता दिवाळी पाडवा आणि भाऊबिजेसाठी राज्याच्या विविध भागात जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांचे नियोजन एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोलमडले असून, प्रवासाचे पर्यायी साधन शोधताना हाल होत आहेत. प्रशासनाच्या वतीने खासगी प्रवासी गाडय़ांना एसटी स्थानकातून वाहतुकीची परवानगी दिली असली, तरी वाहतूकदारांकडून नाडलेल्या प्रवाशांची अक्षरश: लूट केली जात आहे. मनमानी पद्धतीने भाडेवसुली होत असतानाही पर्यायाअभावी ती मुकाटपणे सहन केली जात असून, प्रशासनाने या मनमानी भाडेवसुलीकडे कानाडोळा केल्याचे चित्र आहे.
ऐन दिवाळीत पुकारण्यात आलेल्या या संपामुळे प्रवाशांचे मात्र मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत. दिवाळीसाठी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने पुण्यामध्ये खासगी प्रवासी बससह ६३५ वाहने प्रशासनाच्या वतीने ताब्यात घेण्यात आली आहेत. या वाहनांना शहरातील सर्व एसटी स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त जादा गाडय़ा सोडण्याचे नियोजन केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानातूनही खासगी बस सोडण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्रवाशांची व्यवस्था होत असली, तरी त्यासाठी संबंधित प्रवाशाला अवाढव्य तिकीट दराचा भार सोसावा लागत आहे.
एसटी स्थानकातून प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी देत असतानाच प्रवाशांना एसटीच्या तिकिटाप्रमाणेच दर आकारण्याच्या सूचना वाहतूकदारांना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचे पालन कुणीही केले नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, अमरावती आदी भागांमध्ये जाण्यासाठी दुप्पट ते चारपट भाडेआकारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी गाडय़ांमध्ये बसविले जात आहेत. प्रवाशांसाठी गाडय़ांची व्यवस्था करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. वाहतूकदाराच्या तिकीटदरावर नियंत्रण ठेवण्याचे काम आमचे नाही, असे सांगून एसटी प्रशासनाने हात झटकले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही या मनमानी भाडेवसुलीबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही.