राज्य शासनाने कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण आदी विषयांवरील शासकीय समित्यांमध्ये गुणवत्ता असणाऱ्या मराठा समाजाच्या व्यक्तींना स्थान द्यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजितब्रिगेडच्या सहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचा रविवारी समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कर्मकांडाचे एक स्वरूप असणाऱ्या नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यास संभाजी ब्रिगेडने विरोध करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयात समावेश करावा, यांसह एकूण सहा ठराव मंजूर करण्यात आले.
याप्रसंगी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. जयंत जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड आदी उपस्थित होते. समारोप सत्रातील मंजूर ठरावांमध्ये मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करून मराठा समाजाला त्याप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर उभारले जावे, किल्ले रायगडाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा तसेच राज्यातील इतर गड-किल्ल्यांच्या डागडुजीचे काम हाती घ्यावे, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण सर्वाना सक्तीचे व मोफत करावे, शासनाने एकच शिवचरित्र प्रकाशित करावे, वाघ्या कुत्र्याविषयीच्या नेमक्या अभ्यासासाठी इतिहास संशोधकाची समिती नियुक्त करावी, यांचा समावेश आहे.
यावेळी खेडेकर यांनी प्रसारमाध्यमांवर आसूड ओढले. महाअधिवेशनात प्रसारमाध्यमांची सामाजिक जबाबदारी या विषयावर चर्चा झाली होती. त्याचा धागा पकडून खेडेकर यांनी प्रसारमाध्यमे धनाढ्यांच्या हाती गेल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांकडून लोकशाही व्यवस्थेबद्दल अतिशय धोकादायक चित्र निर्माण केले जात आहे. हे देशासाठी अतिशय घातक आहे. मराठा समाजातील अनेकांनी घरेदारे विकून गावोगावी शाळा, महाविद्यालयांची उभारणी केली. परंतु, प्रसारमाध्यमांनी त्यावर कधी भाष्य केले नसल्याची तक्रारही त्यांनी केली. सर्व क्षेत्रात एका विशिष्ट वर्गाचे वर्चस्व आहे. ते मोडून काढण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये मराठा समाजाच्या बुद्धिवादी मंडळींना स्थान मिळाले पाहिजे, अशी मागणी खेडेकर यांनी केली. विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण स्वत: शासन दरबारी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी नाशिकबरोबर नरसोबाची वाडी व पंढरपूर येथेही विविध धार्मिक विधी होत आहेत. कर्मकांडांच्या नावाखाली चाललेले हे प्रकार रोखण्यासाठी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यास संभाजी ब्रिगेड विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा