सांगली : सर्वसामान्यांच्या जीवनातील बोली भाषा जी वर्षांनुवर्षे बोलली जाते त्यातून विचारांची, भावनांची, संवेदनांची देवाण-घेवाण होत असते. या बोली भाषांमुळेच आज मराठी समृद्ध आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
कर्नाळ येथील तरुण साहित्यिक सचिन वसंत पाटील यांनी संपादित केलेल्या ‘मायबोली, रंग कथांचे…’ या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. भवाळकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महेश कराडकर, आशा कराडकर, महादेव माने उपस्थित होते. त्या म्हणाल्या, की बोलीतील असे अनेक शब्द आहेत जे लुप्त होत आहेत. त्यांची जपणूक करण्याची आज गरज आहे. मराठीतील अनेक बोली भाषांपैकी तावडी, दख्खनी, पोवारी, माणदेशी, मराठवाडी, झाडी बोली, चंदगडी, लेवा गणबोली, मालवणी, जालनी, गोंडी, बंजारा, पावरा, वऱ्हाडी, नगरी, अहिराणी, कोल्हापुरी, आगरी, भिलाऊ इत्यादी निवडक बावीस मराठी बोलीतील कथा घेऊन त्यांचे संपादन सचिन पाटील यांनी केले आहे. हे खूप वेगळ्या प्रकारचे आणि महत्त्वाचे पुस्तक आहे.