‘‘देशभरात घडणाऱ्या अतिरेकी कारवायांचे मराठवाडा कनेक्शन थांबविण्याची ताकद फक्त शिवसेनेतच आहे. हे शिवधनुष्य पेलताना मराठीपण व हिंदुत्व सोडणार नाही. ताकदीचा गैरवापर करणार नाही. प्रश्न सोडवणुकीसाठी शिवसेना काम करेल,’’ असे मत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केले. मराठवाडय़ातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
शहरातील संत तुकाराम नाटय़गृहात मेळाव्याप्रसंगी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, राजकुमार धुत, गणेश दुधगावकर, सुभाष वानखेडे यांच्यासह संपर्कप्रमुख विजय कदम, लक्ष्मण वडले, अनिल देसाई, नीलम गोऱ्हे, अर्जुन खोतकर, विश्वनाथ नेरूरकर, जयप्रकाश मुंदडा, महापौर कला ओझा, जिल्हा परिषद हिंगोलीच्या अध्यक्ष मीनाक्षी बोंढारे, आशा भुतेकर आदींची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना श्री. ठाकरे म्हणाले की, मराठवाडा पाण्यासाठी तळमळतो आहे. न्यायहक्काचे प्रश्नही सुटत नाहीत, मराठवाडय़ातील जनता शिवसेनेकडे अपेक्षेने पाहत आहे. कारण शिवसेनेचा त्यांना आधार वाटतो. शिवसेनाप्रमुखांनी जी जबाबदारी टाकली आहे, ती पूर्ण करण्यासाठी तसूभरही मागे हटणार नाही. बेळगाव-कारवारचा प्रश्न असो वा हिंदूुत्वाचा; शिवसेना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. शिवसेना म्हणजे दुकान नाही; विचार आणि दिशा आहे, असे सांगत श्री. ठाकरे यांनी अफजल गुरू यास फाशी दिलीच पाहिजे, असे मत मांडले. मतासाठी कोणी त्याला फाशी देऊ नका म्हणून लांगूलचालन करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. मराठीपण आणि हिंदुत्व सोडणार नाही. शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर त्यांनी उभी केलेली ताकद सर्वानीच पाहिली. ती वाया जाऊ देणार नाही. जबाबदारीचे शिवधनुष्य निश्चितपणे पेलून धरेन, असेही ठाकरे म्हणाले.
जानेवारीपासून राज्यभर दौरा करणार असून त्याची सुरुवात मराठवाडय़ातून होईल, असेही त्यांनी सांगितले. केवळ मराठवाडय़ातच नाही तर गावागावात संवाद यात्रा करण्याचा मनोदय ठाकरे यांनी व्यक्त केला. पदासाठी आणि सत्तेसाठी नाही, तर बाळासाहेब यांचे स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आयुष्य समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार संजय राऊत यांचे भाषण झाले. तर, खासदार चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडय़ातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहतील, असे आवर्जून सांगितले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा