Uday Samant meets Raj Thackeray: राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. २२ फेब्रुवारी रोजी दोन्ही नेत्यांची शेवटची भेट झाली होती. आजच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सदर भेटीमागचे कारण स्पष्ट केले. मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे काही विषयांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी निमंत्रण दिले होते. त्यानुसार आज त्यांच्याशी चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊनच मी इथे चर्चेसाठी आलो आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात विविध बँका किंवा सार्वजनिक संस्थात मराठीसंबंधी विषय पुढे येत आहेत. त्याचा प्रतिबंध कसा करायचा? याबद्दल राज ठाकरेंनी काही सूचना आम्हाला दिल्या. या सूचनांबद्दल मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. सद्यपरिस्थितीत कशी सुधारणा करता येईल, याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
मराठी भाषेला कायद्याचे वलय हवे
महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जातात. अनेक लोक महाराष्ट्रात आलेली आहेत, त्यांचा आम्हाला आदरच आहे. मनसेलाही त्यांचा आदर आहे. पण ज्यापद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय आणि दादागिरी केली जात आहे. त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तसेच त्याला कायदेशीर वलय असायला हवे, अशी सूचना राज ठाकरेंनी केली. सदर सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात जे राहतात त्यांना मराठी बोलता यायला हवे. इतर भाषांचा आम्ही कुणीही अवमान करत नाहीत. पण माझ्या भाषेचा सन्मानही राखला गेला पाहिजे, अशी राज ठाकरेंची भूमिका आहे आणि आमचीही तीच भूमिका असल्याचे उदय सामंत म्हणाले.
मराठीचा विरोध करणाऱ्यांविरोधात कारवाई?
ज्या बँका आणि संस्थांचा दैनंदिन संबंध मराठी माणसांशी येत असतो, त्यांनी मराठी भाषेत व्यवहार केले पाहिजेत. याबाबत पुढील आठ ते दहा दिवसांत पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली जाणार आहे. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. ज्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्या समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक आहेत. या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्या बाबतीत उलटसुलट व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात काय कारवाई करायची, याची भूमिका त्या बैठकीत ठरवली जाईल, अशी महत्त्वाची माहिती उदय सामंत यांनी दिली.