मातृभाषा जगातील कोणत्याही देशाच्या विकासात साधन मानली जाते. त्यामुळे आपणही मराठी भाषेचा वृथा अभिमान बाळगण्यापेक्षा ती भाषा म्हणून जगविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.
पीपल्स महाविद्यालयात मराठी भाषाविषयक राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. भु. द. वाडीकर होते. राज्य मराठी विकास संस्था मुंबई व पीपल्स महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या वतीने दोन दिवसीय चर्चासत्रास शनिवारी प्रारंभ झाला. ‘मराठी भाषा माध्यमाचे विविध क्षेत्रातील उपयोजन व समस्या’ या विषयावर चर्चासत्रात मंथन झाले. अशोक सोलनकर, प्राचार्य व्ही. एन. इंगोले, मराठी विभाग प्रमुख श्रीनिवास पांडे आदींसह कवी लक्ष्मीकांत तांबोळी, मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. दत्ता भगत यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, की मराठी भाषा विकास, विस्तार आणि संवर्धनात यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. मराठी भाषा सल्लागार मंडळ त्यांनीच स्थापन केले होते; पण १९८० ते २०१० अशी तीन दशके ते बंदच होते. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर मंडळाचे रूपांतर समितीत करण्यात आले. समितीचे अध्यक्षपद आपल्याकडे असून मराठी भाषेतील पारिभाषिक शब्दकोष तयार करण्याचा प्रयत्न समितीचा आहे. आता मराठी भाषा धोरण ठरवले जात असून, त्या अनुषंगाने सूचना मागविण्यात आल्या आहेत. श्रेष्ठ साहित्य निर्मितीमुळे संस्कृत समृद्ध भाषा बनली. केवळ अनुकरणातून निर्माण होणाऱ्या साहित्याला काहीही किंमत नसते, असे मत त्यांनी नोंदवले.
देशातील पहिले विद्यापीठ असा मान असलेल्या मुंबई विद्यापीठात अनेक वर्षे मराठी विभाग नव्हताच. न्यायमूर्ती रानडे यांनी तो सुरू करावा, या साठी आग्रह धरला; परंतु तो अमलात आला तेव्हा १९६४ मध्ये रानडे हयात नव्हते. आपल्याकडे खूप काही आले, पण ते बंदिस्त केल्यामुळे जगासमोर येऊ शकले नाही. संस्कृत भाषा आजही पुणे विद्यापीठात इंग्रजीतून शिकवली जाते, कारण ती शिकण्याची जिज्ञासा मातृभाषा इंग्रजी असलेल्या विद्यार्थ्यांत अधिक आहे. मराठीला प्रतिष्ठा मिळत नाही, तोपर्यंत काही साध्य होणार नाही. त्यामुळे सर्वानी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुढची व्यक्ती काय म्हणेल, असा संकोच करत बसणे हा मराठी माणसाचा स्वभावगुण आहे; त्यापेक्षा आपण आपला मराठी बाणा आग्रहाने जपला पाहिजे, असेही डॉ. कोत्तापल्ले म्हणाले.
सरकारने मराठी भाषेविषयी धरसोडीचे धोरण सोडले पाहिजे. आजकालचे गुरुजी विषयतज्ज्ञ होण्यापेक्षा वेतनश्रेणीपुरतेच काम करतात. त्यामुळे मराठीसारख्या विषयाला दुय्यम स्थान मिळत असल्याचे मत प्रा. वाडीकर यांनी मांडले. यशवंतराव चव्हाण, प्र. के. अत्रे, साने गुरुजी यांची मराठी भाषा कोणाला कळली नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कारण त्यांची भाषा सामान्यजनांची होती. सरल, सोपी आणि सुबोध अशी भाषा रूढ केली तरच मराठी सामान्यांची वाटू शकेल, असेही ते म्हणाले. प्रा. पोतुलवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मथू सावंत यांनी आभार मानले.

Story img Loader