जागतिकीकरणामुळे सर्वत्र मराठीची कोंडी होत असून, भविष्यात मराठी भाषा जिवंत राहील की नाही याची साशंकता आहे. नवोदित साहित्यिकांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी आपला जीव ओतावा, असे भावनिक आवाहन ज्येष्ठ लेखक व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव होते. डॉ. वाघमारे म्हणाले की, न्यायालयात इंग्रजीचा वापर होतो. मराठी शाळा असली, तरीही नाव इंग्रजीत लिहिले जाते. इंग्रजीचा वापर म्हणजे समाजात आपण उच्चस्थानी आहोत, असा सार्वत्रिक समज आहे. मात्र, यामुळेच मराठी भाषेचे खच्चीकरण होत आहे. ‘यूपीएससी’सारख्या स्पर्धा परीक्षेत स्थानिक भाषेला प्राधान्य दिले पाहिजे, तरच भाषा टिकतील. नवोदित साहित्यिकांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
प्रा. चंदनशिव म्हणाले की, मराठवाडय़ाने ७०० वष्रे निजामी राजवट अनुभवली. या काळात मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीपासून आपण पारखे झालो होतो. १९६० नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राचे सामाजिक जीवन बदलले व सर्व क्षेत्रांत ग्रामीण महाराष्ट्राचा शिरकाव सुरू झाला. सांस्कृतिक केंद्र म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे पाहिले जाऊ लागले. दुष्काळानेच महाराष्ट्राला कर्तृत्ववान माणसे दिली. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न गुंतागुंतीचे बनले. आज साऱ्याच मूल्यव्यवस्थेला घरघर लागली आहे. संवेदना व जाणिवा बोथट झाल्या आहेत. सामान्यांचे जगणे दुरापास्त झाले आहे. व्यक्तिकेंद्रितता दिवसेंदिवस वाढत आहे. साहित्यिकांनी तळाच्या माणसाशी संवाद साधला पाहिजे. साहित्य, कलेचा व्यवहार माणसासाठीच असायला हवा. त्यासाठी नवोदित साहित्यिकांनी लेखणी परजावी, असे आवाहन त्यांनी केले. शरद गोरे यांनी प्रास्ताविकात सरकारच्या भूमिकेवर कोरडे ओढले.
ग्रंथिदडीत समतेचा जागर
संमेलनाची सुरुवात ग्रंथिदडीने झाली. संमेलनाध्यक्ष प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते िदडीचे उद्घाटन झाले. महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवरील देखावे व समतेचा संदेश देणारी गीते सादर केली. संस्कारवíधनी, देशीकेंद्र विद्यालय, गोदावरीदेवी लाहोटी विद्यालय आदी विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
‘जागतिकीकरणामुळे मायमराठीची घुसमट’
जागतिकीकरणामुळेर मराठीची कोंडी होत असून, मराठी जिवंत राहील की नाही याची साशंकता आहे. नवोदित साहित्यिकांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी जीव ओतावा, असे आवाहन माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले.
![‘जागतिकीकरणामुळे मायमराठीची घुसमट’](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/07/janardhan-waghmare1.jpg?w=1024)
First published on: 27-07-2014 at 01:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language suffocation globalisation