बेळगावमध्ये उद्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक शासनाच्या विधिमंडळ अधिवेशनाविरुद्ध भरविण्यात येणाऱ्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. बेळगावातील लेले मैदानात होणाऱ्या महामेळाव्यास सीमावासीयांसह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांचा सहभाग असणार आहे. हा महामेळावा यशस्वी व्हावा यासाठी मराठी बांधवांची धडपड सुरू आहे.
कर्नाटक शासनाने बेळगावात कन्नड वर्चस्व कायम राहावे, अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी बेळगावमध्ये विधानसौध बांधण्यात आले आहे. या नव्या सभागृहात कर्नाटक शासनाचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन गेल्या महिन्याभरापासून तयारीला लागले आहे. अधिवेशनामध्ये राज्यपाल, मंत्रिमंडळ, आमदार यांची उपस्थिती असणार आहे. कर्नाटकातील राजकीय परिस्थिती पाहता निवडणुका नजीकच्या काळात येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे मतदारांना खूश करणारे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बेळगावातील कन्नड वर्चस्व आणखी मजबूत व्हावे, या दृष्टीनेही निर्णय घेतले जाणार आहेत.
सीमाभागातील मराठी बांधवांनी कर्नाटक शासनाने बांधलेल्या सुवर्णसौधला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. तो डावलून कर्नाटक शासनाने अधिवेशनाचा घाट घातला आहे. त्यामुळे चवताळून उठलेल्या मराठी भाषकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावात महामेळावा आयोजित केला आहे. ६ वर्षांनंतर होणारा महामेळावा यशस्वी व्हावा, यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.