नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून साहित्य वर्तुळातून चौफेर टीका
मुंबई / नागपूर/ पुणे : ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करता, मग आम्हाला तरी कशाला बोलावता? आमचेही निमंत्रण रद्द करा, इथपासून ते सहगल यांना बोलवा, आम्हीही येऊ, दडपशाही करणाऱ्यांच्या निषेधार्थ आमचाही बहिष्कार, अशा एक ना अनेक संतप्त प्रतिक्रिया मराठी सारस्वतातून उमटू लागल्याने मराठी साहित्य संमेलन केवळ वादाच्या भोवऱ्यात सापडले नाही तर धोक्यातही आले आहे.
यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून आयोजक आणि साहित्य महामंडळावर टीका होत आहे. संमेलनावर बहिष्कार टाकणाऱ्या निमंत्रितांची संख्या वेगाने वाढत असल्याने संमेलनच धोक्यात आले आहे.
साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नकार द्यायचा, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते. साहित्य संमेलनांमधून सरकारांवर, निरनिराळ्या विषयांवर नेहमीच मते व्यक्त केली जातात. त्या मतांकडे-मंथनाकडे सरकारही सकारात्मक दृष्टीने पाहत असते. त्यामुळे ज्या विषयांचा संबंध नाही, तेथे राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न करू नये.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
‘सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी उद्घाटनास जरूर यावे, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल, ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील त्या एक वाहक ठरणार असतील, तर मला किंवा माझ्या पक्षाला आक्षेप असण्याचे कारणच नाही. संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे झालेल्या मनस्तापाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
– राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
नयनतारा सहगल यांना संमेलनात येऊ न देण्याचा निर्णय संतापजनक आहे. मात्र या घटनेकडे एकांगी घटना म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. वैचारिक विरोधकांची हरतऱ्हेने मुस्कटदाबी करण्याची अशी प्रवृत्ती म्हणजे गेल्या काही वर्षांत सत्ताधाऱ्यांनी रुजू घातलेल्या नवसंस्कृतीचाच एक भाग आहे. विचारांचा विपर्यास करणे, असत्यच सत्य म्हणून लादणे, अभिव्यक्तीवर बंधने आणणे ही या नव्या संस्कृतीची लक्षणे आहेत. त्यामुळे अशा संस्कृतीला विवेकी-पुरोगामी महाराष्ट्रात तरी थारा द्यायला नको. महामंडळाने सहगल यांना सन्मानाने संमेलनात आणावे आणि मुख्य म्हणजे बोलू द्यावे!
– सतीश काळसेकर, ज्येष्ठ साहित्यिक
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांची निवड झाल्याने मला आनंद झाला होता. मात्र आता संमेलनाला वाईट वळण लागले आहे. माझी अशी समजूत होती की, संमेलनाबाबतचे सर्व नियम महामंडळ घेते. यापूर्वी असे काही वाद उद्भवल्यावर महामंडळ म्हणायचे की सगळे निर्णय आम्ही घेणार आणि आता कुणीतरी विरोध करते म्हणून महामंडळाने माघार घेणे अयोग्य आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. आता सहगल यांना बोलवले तरी संमेलनाची मजाच गेली आहे.
– रामदास भटकळ, ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक (पॉप्युलर)
संमेलन उधळून टाकू म्हणणाऱ्यांचा, दडपशाही करणाऱ्यांचा मी निषेध करते. संमेलनावर माझा बहिष्कार.
– डॉ. प्रभा गणोरकर
दडपशाहीचा त्रिवार निषेध करतो. संमेलनावर बहिष्कार टाकणार.
– प्रा. वसंत आबाजी डहाके
सहगल यांना येऊ न दिल्याबद्दल मी संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. इतर साहित्यिकांनीही बहिष्कार घालावा. व्यवसाय होत राहील, पण निषेध नोंदवणे महत्त्वाचे आहे. कारण नयनतारा हे नावच मुळात राजकारण्यांना रुचले नव्हते. भाषण आल्यावर काय ते पुढचे पाऊल उचलू असे त्यांनी ठरवले असेल. नयनतारा यांचे भाषण मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर त्यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्यात आले. या वादाविषयी मी स्वत: नयनतारा यांच्याशी संपर्क साधला. त्यांना ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांच्यासाठी त्या एक कार्यक्रम मुंबईत घेणार आहेत.
– येशू पाटील, मुक्त शब्द प्रकाशन
सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निंदनीय कृतीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. मान्यवरांच्या १३ जानेवारीच्या काव्यवाचन कार्यक्रमावर मी बहिष्कार टाकत आहे.
– सायमन मार्टिन, वसई
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकत आहे.
-सिसिलिया काव्र्हालो, वसई
सन्मानाने निमंत्रित केलेल्या लेखिकेचे निमंत्रण काढून घेणे शिष्टसंमत नाही. सहगल गेली ६० वर्षे लिहित आहेत. त्या काय लिहितात हे माहीत होतं. त्यांनी आपली भूमिका लपवलेली नव्हती. त्यांचे नाव चांगलं वाटलं म्हणून बोलावलं होतं का? आधी बोलवायचं मग नकार द्यायचा हा अपमान आहे.
– वीणा गवाणकर
सध्या संमेलनाविषयी जे काही सुरू आहे ते निषेधार्ह, दुर्दैवी आहे. त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. मराठी साहित्य संमेलनामध्ये पाहुण्यांचा अपमान केल्याने इतर भाषिकांमध्ये संमेलनाविषयी नकारात्मक संदेश जात आहे. पुन्हा कधी कोणत्या लेखकाला बोलावले तर तो साशंक असेल. सहगल यांना न बोलावण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. साहित्य संमेलनाला या आधी जेवढी प्रसिद्धी मिळाली नसेल तेवढी कुप्रसिद्धी सध्या मिळत आहे. यामुळे मराठी साहित्य संमेलनाची बदनामी होत आहे.
– अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन
नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून निमंत्रित केल्यानंतर केवळ त्या इंग्रजी भाषिक साहित्यिका असल्याचे भंपक कारण देऊन त्यांचे निमंत्रण रद्द करणे, ही बाब निषेधार्ह आहे. त्यामागचे खरे कारण अर्थातच एक संवेदनशील लेखिका म्हणून देशातील वाढत्या असहिष्णूवरचे त्यांचे भाष्य हे आहे. ही वैचारिक स्वातंत्र्याची गळचेपी आहेच, परंतु तमाम साहित्यविश्वाचा उपमर्द आहे. अर्थात, हा निर्णय संमेलनाच्या कणाहीन संयोजकांचा नाही तर विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या दबावाचा परिणाम आहे. राज्यघटनादत्त व्यक्ती-स्वातंत्र्याची गळचेपी करणारी विद्यमान सत्ताधाऱ्यांची मग्रुरी ठेचून काढण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे सहगल यांची माफी मागून संयोजकांनी त्यांना उद्घाटक म्हणून पुन्हा न बोलविल्यास समस्त मराठी साहित्यिक आणि रसिकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार घालावा. तसे न केल्यास, देशातील उदारमतवादाचे जनक आणि मराठी साहित्य संमेलनाचे शिल्पकार न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याशी प्रतारणा केल्यासारखे होईल आणि साहित्यिक प्रतिभाही अर्थशून्य होईल.
– डॉ. भालचंद्र मुणगेकर
सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय धक्कादायक आणि लाजीरवाणा आहे. त्यातून महामंडळाची विश्वासार्हताच संपुष्टात येणार आहे. महामंडळाच्या नेतृत्वाने केलेली ही मोठी चूक आहे. प्रथमच असे घडले आहे. सहगल या इंदिरा गांधी यांच्या मामेबहीण असूनही त्यांनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयाविरुद्ध कठोर शब्दांत लिखाण केले आहे, याचाही विचार व्हायला हवा होता. तुमच्यासोबत आमच्यावरही (मसाप) ओरखडे ओढले जात आहेत. म्हणून आम्ही धिक्कार करतो. साहित्यिकांची बहिष्काराची भूमिका चुकीची नाहीच.
– कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, मसाप
सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करण्याच्या कृतीचा मी निषेध करतो. झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन केलेली ही कृती उद्वेगजनक, संतापजनक आणि निषेधार्हच आहे. एका ज्येष्ठ लेखिकेचा उपमर्द होत असताना मराठी साहित्य महामंडळाने कणखर आणि रोखठोक भूमिका घ्यावी आणि हे संमेलनच रद्द करून टाकावे, अशी माझी भूमिका आहे. मी संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
– आसाराम लोमटे, सदस्य, साहित्य महामंडळ
‘माध्यमांची स्वायत्तता: नेमकी कुणाची?’ या चर्चासत्रासाठी मला निमंत्रित केले आहे. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण का रद्द करण्यात आले, हे आता स्पष्ट झाले आहे. ते निषेधार्ह आहे. सहगल यांचे संमेलनातील भाषण समाजमाध्यमांतून प्रसारित झाले आहे. त्यांनी देशातील सरकार पुरस्कृत असहिष्णुता आणि सामाजिक समभावाला छेद देणाऱ्या व्यवहारांवर नेमके बोट ठेवले आहे. ती आजची गरज आहे. माझे निमंत्रणही रद्द करावे. यास ‘निमंत्रण वापसी’ समजावे.
– ज्ञानेश महाराव
सहगल यांचे निमंत्रण रद्द करून आयोजक आणि महामंडळाने मोठी चूक केली आहे. चूक सुधारून सहगल यांना सन्मानाने संमेलनात बोलावणार असतील, तरच मी निमंत्रित म्हणून या संमेलनात सहभागी होईन. अन्यथा माझा बहिष्कार ठरलेलाच.
– डॉ. श्रीकांत तिडके
आयोजक संस्था आणि महामंडळाने चुकीचा निर्णय घेतला आहे. हा प्रकार व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. सहगल यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी आणीबाणीलाही विरोध केला होता. राजकीय दबावापोटी हा निर्णय घेण्यात आला असावा.
– डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, अमरावती</strong>
सहगल यांनी लिखित भाषणामध्ये असहिष्णुतेबाबत भाष्य केल्यामुळेच सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन आयोजकांनी त्यांचे निमंत्रण रद्द केले. ही वैचारिक स्वातंत्र्याची गळचेपी आणि अवघ्या साहित्यविश्वाचा उपमर्द आहे. सहगल यांना सन्मानपूर्वक आणावे.
– फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी
नयनतारा सहगल यांना देण्यात आलेले साहित्य संमेलनाचे निमंत्रण त्या अमराठी आहेत, म्हणून रद्द करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. साहित्यिकांना साहित्याचेच मापदंड लावावेत. त्यात मराठी आणि अमराठी असा दुजाभाव करू नये.
-रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ साहित्यिक
भाजप आणि शिवसेना एकत्र लढले वा स्वतंत्रपणे लढले तरी दोघांचा पराभव होणार हे निश्चितच आहे. कारण गेल्या पावणेपाच वर्षांत या उभयतांनी राज्यातील जनतेची फसवणूकच केली आहे. कोणी कितीही आव आणला तरी जनता आता सत्ताधाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
– आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष