अंदमान येथे सप्टेंबरमध्ये होत असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीच्या अध्यक्षपदाची धुरा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समर्पित होत असलेल्या या संमेलनाच्या स्वागत समितीमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतांश मंडळी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा साहित्य वर्तुळामध्ये होत आहे.
अमेरिकेतील सॅनहोजे, सिंगापूर आणि दुबई अशी तीन विश्व साहित्य संमेलने सलग झाल्यानंतर त्यामध्ये तब्बल चार वर्षांचा खंड पडला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्व साहित्य संमेलन करायचेच या निग्रहातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अंदमान हे स्थळ निश्चित केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांत होणारे हे संमेलन त्यांनाच समर्पित करण्यात आले आहे. ‘ऑफबीट डेस्टिनेशन्स आणि पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे ५ आणि ६ सप्टेंबरला येथे चौथे विश्व साहित्य संमेलन होत आहे.
अंदमान येथील संमेलनासाठी स्वागत समिती करण्यात आली असून या समितीचे अध्यक्षपद प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या समितीमध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, खासदार विष्णुपद राय, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध देशपांडे, सामाजिक समरसता मंचाचे भिकुजी ऊर्फ दादा इदाते, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे रणजित सावरकर, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, गणेश राऊत, माजी आमदार उल्हास पवार आणि अशोक मोडक यांच्यासह अंदमान येथील प्रशांत श्रोत्री, गोरख पाटील, अशोक साधू आणि संतोष माने या स्थानिक संयोजकांचा समावेश आहे.

सत्तेभोवती फिरणारी संमेलने
साहित्य संमेलनामध्ये राजकीय व्यक्ती नकोत अशी भूमिका सातत्याने मांडली जात असली तरी राजकारण्यांशिवाय संमेलने होऊ शकत नाहीत हे वास्तव नाकारता येत नाही. घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू या केंद्रीय मंत्र्यांनी भरघोस मदत केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे व्यासपीठावर होते.

Story img Loader