मराठी साहित्य संवर्धनासाठी राज्य सरकारने जास्त निधीची तरतूद करावी, अशी मागणी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली. ते अलिबाग येथील सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्याच्या वारशाचे जतन होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
या वेळी चंद्रशेखर ओक महासंचालक, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राजा पवार, ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे, विसूभाऊ बापट, नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि अभिनेता शशांक केतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवी पिढी साहित्यापासून दूर चालली आहे. हे कुठेतरी रोखणे आवश्यक आहे. मराठी भाषेसाठी त्यात निर्माण होणारे साहित्य अधिक समृद्ध व्हावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. १९८० ते १९९० च्या दशकात अलिबाग हे राज्यातील साहित्यनिर्मितीचे एक प्रमुख केंद्र होते. या काळात अलिबाग शहर आणि परिसरात जवळपास ४० ते ४५ छापखाने कार्यरत होते. चिंतामणराव जोशी यांनी याच काळात माधव िपट्रिंग प्रेसची सुरुवात केली होती. या काळात राज्यातील नामांकित साहित्यिक, कवी आणि लेखक अलिबागमध्ये येत असत. दरवर्षी जवळपास चारशे दिवाळी अंक अलिबागमधून छापले जात होते. मी स्वत:ही चार दिवाळी अंकांचे लेआऊट डिझाइिनग आणि िपट्रिंगची काम करत होतो. काळाच्या ओघात अलिबागची ही ओळख पुसली गेली आहे. ती पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. प्रेसमधील अनेक नामांकित लेखक, साहित्यिक, कवी अलिबागमध्ये येत असतात. समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद साहित्यात आहे. त्यामुळे या साहित्याचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
वाचक, लेखक आणि प्रकाशक एकत्र यावेत यासाठी राज्यभर जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवांचे आयोजन केले जात असल्याचे या वेळी महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी सांगितले. आज वाचकांना ई-बुक्ससारखा पर्याय उपलब्ध असला तरी पुस्तक वाचण्याची मजा काही औरच असते. त्याचा आनंद लुटायला शिकले पाहिजे. असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
आजचा विद्यार्थी माध्यम आणि मीडियम यांच्या वादात अडकला आहे. त्यामुळे धड मराठीवर प्रभुत्व नाही की चांगले इंग्रजी येत नाही. अशी गत त्यांची होते. मराठी भाषेचे महत्त्व त्यांना कळत नाही. त्यामुळे असे उत्सव मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपयुक्त असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी अरुण म्हात्रे यांनी या वेळी सांगितले.
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आज मुलांना पुस्तकांचा विसर पडत चालला आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरच्या युगात तरुण पिढी गुरफटून गेली आहे. वाचनाचा छंद नाहीसा होत चालला आहे. त्यामुळे तरुण पिढीला पुन्हा एकदा पुस्तकांच्या विश्वात आणणे हा या ग्रंथोत्सवाचा मूळ उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी या वेळी सांगितले.
मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो. परदेशात गेलो. उच्च शिक्षण घेतले. पण देशात असो अथवा परदेशात, मला माझ्या भाषेची जोडलेली नाळ तोडायची नव्हती. त्यामुळे मी लिहीत राहिलो. भाषेबद्दल असणारे प्रेम आणि कलाक्षेत्रात काम करण्याची इच्छा यामुळेच मी ऑस्ट्रेलिया सोडून परत आलो, असे अभिनेता शशांक केतकर यांनी या वेळी सांगितले. शिक्षण घेतल्याशिवाय तुमच्या व्यक्तिमत्त्वात अ‍ॅटिटय़ूड येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने शिकले पाहिजे आणि वाचलेही पाहिजे, असेही तो म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा