कर्नाटक सरकारचे परिपत्रक मराठी भाषेतही प्रसिद्ध झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी कर्नाटक विधिमंडळात करणारे बेळगावमधील आमदार संभाजी पाटील यांच्या कॅम्प भागातील कार्यालयाची कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मोडतोड केली. याला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा मराठी भाषक युवा आघाडीने दिल्याने बेळगावमधील मराठी विरुद्ध कानडी संघर्ष पुन्हा तापला आहे.
कर्नाटक सरकारने सलग दुसऱ्या वर्षी बेळगाव येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आयोजित केले. सभेचे कामकाज सुरू झाल्यावर आमदार संभाजी पाटील यांनी घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली कर्नाटक शासन करीत असल्याचा आरोप केला. ज्या भाषेचे पंधरा टक्के लोक राहतात तेथे त्यांच्या भाषेत शासनाने परिपत्रक निघाले पाहिजे, असे घटनेत नमूद असताना कर्नाटक सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या या विधानाला आक्षेप घेत कन्नड आमदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर आमदार संभाजी पाटील व आमदार अरविंद पाटील यांनी राष्ट्रभाषा हिंदीतून आपल्या विधानाचा सारांश मांडण्यास सुरुवात केली. मात्र तरीही त्यांनी कन्नड भाषेत बोलावे, असा आग्रह धरत कानडी भाषक आमदारांनी गोंधळ सुरू केला. याचा निषेध नोंदवीत आमदारद्वयीने सभात्याग केला.
तेथून हे आमदार मराठी भाषक महामेळाव्याकडे गेले असता कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आमदार संभाजी पाटील यांच्या कॅम्प भागातील कार्यालयाची मोडतोड केली. मात्र, मराठी भाषक युवा आघाडीचे उपाध्यक्ष भाऊ शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी त्यांना पिटाळून लावले.   
दरम्यान, बेळगाव येथे मराठी भाषकांचा महामेळावा ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, मुंबईचे महापौर सुनील प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, आमदार के. पी. पाटील यांच्यासह मराठी भाषकांच्या उपस्थितीत पार पडला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा