राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘म्होरक्या’चे निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केली. कर्करोगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं समजतं. ते ३८ वर्षांचे होते. कल्याण पडाल यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर इथल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कल्याण यांना आतड्याचा कर्करोग झाला होता. कर्करोगाने त्रस्त असलेल्या पडाल यांना काविळही झाला होता. या आजारपणाला कंटाळून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.
कल्याण पडाल यांच्या ‘म्होरक्या’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने या सिनेमाची मोठी उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या या सिनेमाची तारीख पडाल यांच्या आत्महत्येमुळे पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.