नवी दिल्ली : जो मराठी समाज उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्टया सक्षम आहे आणि ज्याची आकांक्षा सर्व स्तरावर जागतिकतेशी स्पर्धा करायची आहे. त्याची संख्या आजच्या यंत्रयुगात वेगाने वाढत आहे. या अस्वस्थ करणाऱ्या भोवतालात मला मराठीच्या भवितव्याबद्दल चिंता वाटते, असे परखड मत नवी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याची चौफेर चर्चा होत आहे. मात्र त्यापुढील आव्हानांचाही वेध घेणे गरजेचे असल्याचे डॉ. तारा भवाळकर यांनी नमूद केले. विज्ञान भवन येथे आयोजित संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रात त्या बोलत होत्या. या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेच्या विविध पैलूंना स्पर्श करतानाच समाजातील वाईट चालीरितीवरही डॉ. तारा भवाळकर यांनी प्रहार केला. त्या म्हणाल्या, बहुुसंख्य लोक ज्यांना आर्थिक स्वास्थ्य आहे, सामाजिक दर्जा आहे आणि त्यांचे मेंदू काम करीत नाहीत. त्यांचे मन आणि मेंदू मोकळे होणे गरजेचे आहे. जे कर्मकांडात गुंतून राहतायेत आणि त्याचे समर्थन करत आहेत त्यांना सुशिक्षित का म्हणायचे? त्यांना फक्त लिहिता वाचता येेते, पण ज्ञानाने तर धीर यायला पाहिजे. भीती अज्ञानाने वाढते. ज्ञानाने ती दूर होेते.ज्ञानाने भीती जाण्याऐवजी वाढत असेल तर लिहिता- वाचता येणाऱ्या पदवीधरांना सुक्षिशित कसे म्हणायचे?नवीन असते ते सर्व टाकाऊ असतेच असे नाही. जी शहाणी माणसे असतात ती स्वत:चे डोके वापरतात आणि जे दुसऱ्याच्या बुद्धिवर अवलंबून असतात ते अमूक – तमूक महाराजांनी सांगितलेय, असे सांगतात. या बौद्धिक शरणागतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे. असे आवाहनही तारा भवाळकर यांनी केले. त्यांचे भाषण संपताच अवघ्या सभागृहाने उभे राहून टाळयांच्या गजरात मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा?

देहाचा विटाळ. देहीच जन्मला

शुद्ध तो जाहला कवणप्राणी

उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान

कोण देह निर्माण नाही जगी

असे आमच्या संत कवयित्रींनी सांगितले आहे. मग मला असा एक माणूस दाखवून द्या जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आलेला नाही. तरीही आज कुणी म्हणत असेल माझा जन्म जैविक नाही, तर त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा? अशा लोकांचा भंडाफोड आमच्या संत कवयित्रींनी १३ व्या, १४ व्या शतकातच केला आहे. ज्यावेळी लिहण्या वाचण्याला स्थान नव्हते त्यांनी हे समाजाला आरसा दाखवणारे साहित्य लिहूून ठेवले आहे.त्यांना स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या म्हणायचे की नाही, असा सवालही ताराबाई भवाळकर यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार, संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार उपस्थित होते.

विद्यापीठांवर शासकीय बंधने का?

विद्यापीठांच्या आजच्या स्थितीवर भाष्य करताना ताराबाई म्हणाल्या, सध्या विद्यापीठांवर शासकीय बंधनांचे प्रमाण खूप वाढले आहे. कुलगुरूंच्या नेमणुका, कुलगुरूंनी नेमके काय करायचे, याचे आदेश आजकाल शासकीय स्तरावरून येतात. एखादा शासकीय आदेश अचानक येतो आणि अमूक दिवशी अमूक दिन साजरा करा, असे निर्देश दिले जातात. परंतु, काय साजरे करायचे आणि काय टाळायचे, याचा निर्णय विद्यापीठांना स्वत: घेऊ द्यायला हवा. शासन त्यात का हस्तक्षेप करते?

Story img Loader