समाजातील सर्वच क्षेत्रांत सध्या गढूळ वातावरण आहे. निराशा, नकारात्मकता व भ्रष्टाचार अनेक प्रश्नांना जन्म घालत आहेत. अशा वेळी केवळ ग्रंथ हाच प्रामाणिक सोबती आहे. असे ग्रंथ उपलब्ध करण्याचे काम करणारी मराठवाडा साहित्य परिषद व पत्रकार संघ ही लोकचळवळ चालवत आहे. आगामी काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेणे उस्मानाबादकरांना सहज शक्य आहे, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी व्यक्त केला.
मराठवाडा साहित्य परिषद, तसेच जिल्हा पत्रकार संघातर्फे साहित्य अकादमी या संस्थेचे पुस्तक प्रदर्शन-विक्री पशुवैद्यकीय सभागृहात आयोजित केली आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मसापचे अध्यक्ष नितीन तावडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार व जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची उपस्थिती होती. प्राप्त स्थितीत निर्माण झालेल्या सर्व संकटांना भिडण्याची क्षमता मराठी साहित्यात आहे. यातही मराठवाडय़ातील कविता प्रभावीपणे समाजातील वास्तव घेऊन समोर येत आहे. अशा साहित्य व साहित्यिकांना उस्मानाबादकरांनी नेहमीच पाठबळ दिले. या जोरावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत व्हावे, या साठी जिल्ह्यातील संस्था-संघटनांनी मसापला दिलेले बळ कौतुकास्पद आहे. अशा छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमातून संमेलनासाठी वातावरण निर्मिती होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उस्मानाबादची माती जे सकस, दर्जेदार व उत्तम आहे, त्याला नेहमीच प्रतिसाद देते. मागील ४ वर्षांत आपल्याला वेळोवेळी ती अनुभूती आल्याचे जिल्हा माहिती अधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले. उस्मानाबादच्या सांस्कृतिक चळवळीत मानाचा तुरा खोवेल, असे संमेलन नक्कीच उस्मानाबादकर आयोजित करू शकतील. त्यासाठी आतापासून सर्वसमावेशक तयारी व्हायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.
पोतदार यांनी साहित्यिक व साहित्य संघटन यांच्या प्रयत्नातून अनेक उपक्रम राबविता येतील, असा विश्वास व्यक्त केला. मसाप शाखाध्यक्ष नितीन तावडे यांनी प्रास्ताविकात मागील २ वर्षांत मसापने केलेल्या विविध कार्यक्रमांचा लेखाजोखा मांडला. रवींद्र केसकर यांनी सूत्रसंचालन केले.
साहित्य अकादमीचे सुरू असलेले पुस्तक प्रदर्शन बुधवापर्यंत (दि. १७) खुले आहे. या अनुषंगाने दररोज सायंकाळी ५ वाजता विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी कविसंमेलन, तर सोमवारी अॅड. राज कुलकर्णी यांचे ‘आधुनिक भारताचे जनक पंडित नेहरू’ या विषयावर व्याख्यान झाले. उद्या (मंगळवारी) उदयसिंह पाटील यांचा ‘बोलका बाहुला’ हा कार्यक्रम होईल. बुधवारी तहसीलदार सुभाष काकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रदर्शनाचा समारोप होईल. याचा व पुस्तक प्रदर्शनाचा वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघ व मसापने केले आहे.

Story img Loader