मराठी साहित्य संमेलन अजून झाले नाही, अशा भागाला यजमानपद मिळावे, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सतत आग्रही असते. उस्मानाबादकरांची तयारी, आदरातिथ्य व सर्व स्तरातून होणारी आग्रही मागणी पाहता महामंडळ उस्मानाबादकरांना निराश करणार नाही, असे प्रतिपादन महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी केले. त्यामुळे उस्मानाबादेत ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याचा मार्ग सुकर झाल्याचे दिसत आहे.
शहरातील मेघमल्हार हॉटेलच्या सभागृहात जिल्हाभरातील विविध संस्था, संघटना पदाधिकारी व नागरिकांची बठक झाली. या वेळी डॉ. वैद्य बोलत होत्या. महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाहक प्रकाश पायगुडे, सदस्य कुंडलिक अतकरे, प्रदीप दाते, उज्ज्वला मेहेंदळे, नितीन तावडे, किरण सगर यांची उपस्थिती होती. उस्मानाबादच्या मसापची तयारी पाहून आनंद झाला. महामंडळाचे सर्व पदाधिकारी एकत्रित बसून निर्णय घेतील. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटनांच्या वतीने व्यक्त होणारी प्रबळ इच्छा मी महामंडळाच्या सर्व सदस्यांसमोर मांडेन, असेही वैद्य यांनी स्पष्ट केले. शेवटी निर्णय महामंडळाचा आहे. मात्र, अध्यक्ष म्हणून उस्मानाबादकरांना निराश करणार नाही, असे सांगत वैद्य यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत सकारात्मक संकेत दिले.
सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, प्रदीप दाते, उज्ज्वला मेहेंदळे यांनीही उस्मानाबादला साहित्य संमेलन मिळावे, यासाठी आपण महामंडळासमोर बाजू मांडू, असे सांगितले. प्रास्ताविकात नितीन तावडे यांनी स्थानिक शाखेच्या उपक्रमांची माहिती दिली.
उस्मानाबाद मसाप शाखेने संमेलनाचे यजमानपद मिळावे, यासाठी महामंडळाकडे प्रस्ताव दिला होता. त्या अनुषंगाने महामंडळाने येथे येऊन स्थळ निश्चितीसाठी विविध ठिकाणांची पाहणी केली. उस्मानाबादकरांची मागणी केवळ भावनिक नाही, तर व्यावहारिक असल्याचे मत ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी मांडले.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत आडसूळ, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मानद अध्यक्ष एम. डी. देशमुख, व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनार साळुंके, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, प्रा. डॉ. महेंद्र चंदनशिवे, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष शीतल मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रवींद्र केसकर, राजेंद्र अत्रे यांनी केले. आभार बालाजी तांबे यांनी मानले. कृपा सांजेकर यांनी पसायदानाने समारोप केला.
उस्मानाबादकरांना निराश करणार नाही- डॉ. वैद्य
साहित्य संमेलन अजून झाले नाही, अशा भागाला यजमानपद मिळावे, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सतत आग्रही असते. उस्मानाबादकरांची तयारी, आग्रही मागणी पाहता निराश करणार नाही, असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी केले.
First published on: 26-06-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi sahitya sammelan now easy for osmanabad