बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत मराठी अस्मितेचा भगवा झेंडा डौलाने फडकाविल्यानंतर आता सीमा भागातील मराठी भाषिक जनता कर्नाटक विधानसभेवर हा ध्वज लहरत ठेवण्यासाठी एकजूट झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्य़ातील चार मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकच उमेदवार उभा असल्याने त्यांच्या विजयाची आशा पल्लवित झाली आहे. बऱ्याच दिवसांनंतर मराठी भाषिकांनी एकतेची वज्रमूठ कायम ठेवीत एकसंघ प्रचाराचे रान उठविले आहे. अशा स्थितीत सीमाप्रश्न व सीमावासियांबद्दल नेहमीच आवाज उठविणाऱ्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, पुरोगामी पक्षांनी चारही उमेदवार निवडून येण्यासाठी आपली ताकद पणाला लावण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांनी प्रचारामध्ये हिरीरिने भाग घ्यावा अशा अपेक्षाही सीमावासियांतून तीव्रपणे उमटू लागल्या आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर कर्नाटकातील मराठी भाषिकांवर कर्नाटक शासनाची दंडेलशाही वाढली आहे. विशेषत बेळगाववर कन्नड सक्तीचा वरवंटा फिरवून मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न कर्नाटक शासनाकडून केला जात आहे. याविरुध्द बेळगाव जिल्ह्य़ातील सीमावासियांनी जोरदार संघर्ष उभा करत मराठी अस्मिता कायमपणे जपली आहे. त्याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकांमध्ये येत होता. मात्र मराठी भाषिक नेत्यांतील श्रेयवाद आणि संघटनांचा सवतासुभा मांडण्याची प्रवृत्ती यामुळे मराठी भाषिकांचे प्रतिनिधीत्व सभागृहात पोहोचणे दुरापास्त बनले होते. यामुळेच गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिकांची यशाची पाटी कोरीच राहिली होती. त्याचा फायदा घेत बेळगावातील कन्नडधार्जिणे धोरण अधिकच प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली. कर्नाटक विधानसभेचे वर्षांतून एक अधिवेशन घेण्यासाठी बेळगाव शहरातच विधानसौंधची (विधानसभा) उभारणी करण्यात आली.
बेळगाव महापालिकेमध्ये मराठी महापौर व उपमहापौर असल्याच्या आकसातून ती कर्नाटक शासनाने बरखास्त केली. परिणामी तेथील मराठी जनता खवळून उठली. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत मराठी भाषिकांनी एकजूट कायम राखत महापालिकेवर भगवा फडकविला. हे यश ताजे असतानाच आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. महापालिका निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी मराठी भाषिक नेत्यांनी सामंजस्य दाखवून एकतेची वज्रमूठ उगारली आहे. त्यातूनच बेळगाव उत्तर (रेणू किल्लेदार), बेळगाव दक्षिण (संभाजी पाटील), बेळगाव ग्रामीण (मनोहर किणेकर) आणि खानापूर (अरविंद पाटील) या चार मतदारसंघांमध्ये एकच मराठी भाषिक उमेदवार उभे करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांतील प्रचारामध्ये मराठी भाषिक एकजुटीने उतरले असल्याने या उमेदवारांच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बेळगाव जिल्ह्य़ातील मराठी भाषिक आता महाराष्ट्राकडे मोठय़ा अपेक्षेने पाहात आहेत. सीमालढय़ाला ताकद देणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठी भाषिक उमेदवार निवडून आणण्यासाठी धावून यावे, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे, मनसेचे संस्थापक राज ठाकरे, ज्येष्ठ पुरोगामी नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील आदी प्रमुख नेत्यांच्या सभा चार मतदारसंघात व्हाव्यात अशी अपेक्षा मराठी बांधवांकडून व्यक्त होत आहे.
चार मतदारसंघात विजयाची अपेक्षा
बेळगाव जिल्ह्य़ातील चार मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकच उमेदवार उभा असल्याने त्यांच्या विजयाची आशा पल्लवित झाली आहे. बऱ्याच दिवसांनंतर मराठी भाषिकांनी एकतेची वज्रमूठ कायम ठेवीत एकसंघ प्रचाराचे रान उठविले आहे.
बेळगावमधील मराठी एकजुटीला महाराष्ट्रातील नेत्यांची प्रतीक्षा
बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत मराठी अस्मितेचा भगवा झेंडा डौलाने फडकाविल्यानंतर आता सीमा भागातील मराठी भाषिक जनता कर्नाटक विधानसभेवर हा ध्वज लहरत ठेवण्यासाठी एकजूट झाली आहे.
First published on: 28-04-2013 at 02:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi unity in belgam waiting for maharashtra leaders