राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील संघटनांची अमरावतीला ९ जुलै ते १६ जुलैपर्यंत मॅरेथॉन बैठक होणार असून हिंदुत्वाचा मुद्दा वगळून विकासाच्या मुद्दय़ाभोवती फिरणारे भाजपचे निवडणूक धोरण ठरविण्यावर बंदद्वार विचारविमर्श होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळाले आहेत. नागपूरच्या संघ मुख्यालयात डॉ. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि विद्यमान भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. सलग तीन दिवसात तीन बडे नेते नागपुरात धडकल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. या पाश्र्वभूमीवर अमरावतीला होणाऱ्या बैठकीत भाजपच्या निवडणूक रणनितीची दिशा निश्चित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अमरावतीत पहिल्यांदाच संघाची बैठक होत असून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी सोमवारी शहरात पोहोचले. या बैठकीत निवडणुकीतील रणनीतीसोबतच संघाचा वर्षभरातील लेखाजोखा (की रिस्पॉन्सिबल एरिया) मांडला जाणार आहे. संघ आणि भाजपमधील अंतराचे दावे सातत्याने केले जात असले, तरी या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील दोन नेते उपस्थित राहतील, असे संकेत मिळाले आहेत. संघाची ही बंदद्वार बैठक आहे. जिल्हा संघचालक चंद्रशेखर भोंदू यांच्या मालकीच्या व्यंकटेश लॉन आणि पद्मावती लॉनच्या परिसरातील सुसज्ज इमारत बैठकीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संघाच्या या बैठकीला महत्व आले आहे. पहिले तीन दिवस (९ ते १० जुलैपर्यंत) जवळपास ३४ संघटनांचा लेखाजोखा जाणून पुढील काळातील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. यानंतर ११ ते १३ जुलैपर्यंत संघाच्या प्रचारक आणि प्रमुख स्वयंसेवकांचे विचारमंथन होईल. बैठकीला सरकार्यवाह भैय्याजी जोशी, सहकार्यवाह दत्ता होसबळे, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सोनी, विहिंप नेते अशोक सिंघल, डॉ. प्रवीण तोगडिया यांच्यासह अनेक नेते हजेरी लावतील. भाजपचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी १३ जुलै रोजी येण्याची शक्यता आहे. मंगळवारी संघाच्या ‘कोअर ग्रुप’ची बैठक होईल. संघ परिवारातील ३२ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह २५० प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचे धोरण ठरविताना समाविष्ट करावयाच्या मुद्दय़ांवर मंथन केले जाणार आहे. ‘हिंदू कार्ड’ ऐवजी भाजपने विकासाच्या मुद्दय़ावर भर देऊन त्या दिशेने निवडणूक धोरण आखावे, अशी एक सूचना संघ वर्तुळातूनच पुढे आली आहे. भाजपच्या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांसोबत सरसंघचालकांनी नागपुरात याच मुद्दय़ावर चर्चा केल्याचे समजते. परंतु, संघाच्या सूत्रांनी याबाबत मौन बाळगले आहे. भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या ‘पॅटर्न’भोवती फिरणारा ठेवून त्याचा वापर भाजपने प्रचारादरम्यान जास्तीत जास्त प्रमाणात करावा, यासाठी संघाकडून दबाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे हिंदूंसह अन्य मतदारही भजपजवळ येतील, असे आडाखे बांधण्यात येत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजपासून अमरावतीत ‘मॅरेथॉन’ विचारमंथन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील संघटनांची अमरावतीला ९ जुलै ते १६ जुलैपर्यंत मॅरेथॉन बैठक होणार असून हिंदुत्वाचा मुद्दा वगळून विकासाच्या मुद्दय़ाभोवती फिरणारे भाजपचे निवडणूक धोरण ठरविण्यावर बंदद्वार विचारविमर्श होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळाले आहेत.
First published on: 09-07-2013 at 04:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathon meeting of rashtriya swayamsevak sangh from today at amravati