औरंगाबाद- कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात प्रतिसाद मिळाला. सकाळी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांनी बंद ठेवावा, यासाठी आवाहन केले. शहरातील बहुतांश ठिकाणी दुकाने बंद होती. हत्येचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोर्चाही काढला. गोविंद पानसरे अमर रहे, अशा घोषणाही त्यांनी दिल्या.
उस्मानाबादमध्ये मोर्चा
उस्मानाबाद-  कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शंभर टक्के बंद पाळला. नेहरू चौकातून निघालेल्या निषेध मोर्चात उस्मानाबादमधील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेऊन या हत्येच्या निषेधार्थ आपला संताप व्यक्त केला. गांधी हम शरिमदा है, आपके कातील जिंदा है, अमर रहे, अमर रहे, कॉ. गोिवद पानसरे अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा देत शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांसह सर्व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले.
 पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोिवद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ उस्मानाबादमध्ये रविवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व पक्षांचे पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सामान्य उस्मानाबादकरांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. यात माजी मंत्री आमदार मधुकर चव्हाण, आमदार राणाजगजितसिंह पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, शेकापचे भाई अविनाश देशमुख, भाई धनंजय पाटील, माजी नगराध्यक्ष सत्तार शेख आदींची उपस्थिती होती.
बीडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
बीड-  कॉ. गोिवद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी या मागणीसह हल्ल्याचा निषेध करत डाव्या पक्षांसह विविध संघटनांचे कार्यकत्रे जागोजागी रस्त्यावर उतरले. राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत ‘आम्ही सारे पानसरे’ अशी हाक कार्यकर्त्यांनी दिली. जिल्हा बंदला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. प्रदेश स्तरावरून डाव्या पक्षांच्या बंदला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. परंतु स्थानिक पातळीवर या पक्षांचे कार्यकत्रे मात्र कोठेही रस्त्यावर उतरलेले दिसले नाही. माजलगावमध्ये भाजप आमदार आर. टी. देशमुख यांनी मात्र निषेध मोर्चात हजेरी लावली.
परभणी बंददरम्यान कार्यकर्त्यांना अटक
परभणी- कॉ. गोिवद पानसरे यांच्या खुनाच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यात डाव्या पक्षाने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. परभणीत बंद दरम्यान मोटारसायकलवर फिरणाऱ्या भाकपच्या ४५ कार्यकर्त्यांना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी माकपच्या १५ कार्यकर्त्यांना नवा मोंढा पोलिसांनी अटक केली.
 कॉ.विलास बाबर व कॉ. कीर्तीकुमार बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून राज्यसरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी कार्यकत्रे व पोलिसांत झटापट झाली. पोलिसांनी बाबर, बुरांडे, भास्कर खुपसेसह १५ जणांना अटक केली. आजचा जिल्हा बंद शांततेत पार पडला.

Story img Loader