मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत कोऱ्या मतपत्रिकांच्या देवाण-घेवाणीपासून ते मतदारांचे पत्ते बदलण्यापर्यंत विरोधकांनी केलेल्या आरोपानंतरही कौतिकराव ठाले-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने घवघवीत यश मिळविले. परिवर्तन आघाडीने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाला हाताशी धरूनही त्यांना त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. कौतिकराव ठाले-पाटील यांच्यासह सर्व २२ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीच्या आमदाराचा पाठिंबा घेऊनही परिवर्तन आघाडीला अपयश आले, हे विशेष.
शुक्रवारी सकाळी १० वाजता मसापच्या अनंत भालेराव भवनमध्ये निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी दोनच्या सुमारास निकालाचा अंदाज येऊ लागला होता. पहिल्या फेरीतच ठाले-पाटील यांच्या पॅनेलमधील सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रदेव कवडे यांनी सायंकाळी निकाल जाहीर केला. निवडणुकीत २ हजार २४६ मतदान झाले. यातील दीड हजाराहून अधिक मतदान ठाले-पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना मिळाले. या पॅनेलमध्ये देविदास फुलारी यांना सर्वाधिक १ हजार ५९९ मते मिळाली.
ठाले-पाटील, दादा गोरे, के. एस. अतकरे, डॉ. हृषिकेश कांबळे, रसिका देशमुख, दगडू लोमटे, किरण सगर, नितीन तावडे, आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके, संजीवनी ताडेगावकर, भास्कर बढे, शेषराव मोहिते, जगदीश कदम, सुरेश सावंत, देविदास फुलारी, विलास वैद्य, हेमलता पाटील, संतोष तांबे व जीवन कुलकर्णी हे उमेदवार निवडून आले.
मसाप निवडणुकीच्या निकालाची कमालीची उत्सुकता होती. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील वाद साहित्य संस्कृतीच्या अंगणात आल्याने ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपाच्या स्तरावर चांगलीच गाजली. ७२ वर्षे पूर्ण झालेल्या मसापवर पुन्हा एकदा ठाले-पाटलांचेच वर्चस्व सिद्ध झाले.

Story img Loader