आज मराठवाडा मुक्तीसंग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन साजरा केला जात आहे. औरंगाबादमध्ये या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या.
हेही वाचा- विश्लेषण : १७ सप्टेंबर – ‘हैदराबाद मुक्ती दिन’ की ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’?
मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन. हा लढा सोपा नव्हता. मात्र, रझाकारीच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू, असे आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून स्वच्छता भारतसाठी १२०० कोटी मिळाले मिळाले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन का साजरा केला जातो?
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
मुख्यमंत्र्यांकडून विविध घोषणा
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यासोबत रस्ते आणि रेल्वे मार्गाने मराठवाड्याला जोडण्यासाठीची विकासकामंही वेगानं व्हावीत, यासाठी भरीव तरतूद केली असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी १३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार. जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार. मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प हाती घेणार. जालना पाणीपुरवठा नूतनीकरण. नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार. लातूरमध्ये कृषी महाविद्यालयाची तरतूद. मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
शिवसेनेकडूनही ध्वजारोहण
या कार्यक्रमानंनतर मुख्यमंत्री हैदराबादला जाणार आहेत. हैदराबाद मुक्तीसंग्रामाशी संबंधित महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मात्र शिंदेंच्या या दौऱ्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे. तर शिवसेनेकडूनही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.