मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबाद, नांदेडमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने हैदराबादमध्येही राष्ट्रीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी औरंगाबादमधील शासकीय कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सकाळी नऊऐवजी सात वाजताच आटोपण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैदराबादमधील कार्यक्रमासाठी रवाना झाले. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हैदराबादमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर वाद निर्माण झाला असून शिवसेनेकडून औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा ध्वजारोहण करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही औरंगाबादमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगाबादमधील विजयस्तंभाजवळ सकाळी सातच्या सुमारास ध्वजारोहण करण्यात आलं. मात्र, त्यावरून शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांवर टीकास्र सोडण्यात आलं आहे. “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाहांच्या आदेशावरून निर्णय घेतात आणि त्यांच्या आदेशावरूनच हैदराबादला जात आहेत”, अशा शब्दांत शिवसेनेचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमाची वेळ बदलल्याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“हा चटावरचं श्राद्ध आटोपण्याचा प्रकार”

“चटावरचं श्राद्ध आटोपणं म्हणतात याला. म्हणजे ना श्राद्धाचं जेवलंही जात नाही आणि ज्याला पोहोच व्हायचं त्याला पोहोचही होत नाही. म्हणजे त्याला कावळाही शिवत नाही, अशा पद्धतीने आटोपला गेलेला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवसेनेनं रीतसर नऊ वाजता हा कार्यक्रम केला आहे”, अशी प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

“दिल्लीच्या पातशहांसाठीच…”,मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमावरून शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड!

“त्यांना पातशाहांची मर्जी राखणं जास्त महत्त्वाचं वाटलं”

“हैदराबादला जाणं अयोग्य नाही. पण वेळ आपण बदलू शकलो असतो. स्वातंत्र्यसंग्राम, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन या कार्यक्रमाच्या वेळा वर्षानुवर्षापासून ठरल्या आहेत. त्यात फार अपवादात्मक स्थितीत बदल होतात. इथे काही अपवाद नव्हताच. तुम्ही नऊऐवजी दहाला जाऊ शकले असते किंवा त्यांना विनंती करू शकले असते. पण मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र किंवा मराठवाड्यापेक्षा दिल्लीच्या पातशाहांची मर्जी राखणं महत्त्वाचं वाटलं आहे. मराठवाड्याची अस्मिता जपणं हे काम आमचं आहे. पण महाराष्ट्र दिल्लीवरून चालवला जात आहे”, अशा शब्दांत दानवेंनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada mukti sangram shivsena flag hoisting at aurangabad after cm eknath shinde pmw