नीरव शांतता. चार-पाचजण पाय मुडपून बसलेले. कोणाच्या डोक्याला मफलर, तर काही जणींनी पदराने चेहरा झाकलेला.. जणू मृत्यूच दबा धरून बसलेला! भोकरदनचे मूळ रहिवासी बळीराम जाधव पत्नीच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी सरकारी कागदपत्रांची जंत्री घेऊन केव्हाचे बसलेले. रुग्णालयात नेहमी असणारी धावपळ नाही की, गडबड. हळूच बोलले तरी या टोकाचे त्या टोकाला ऐकू जाण्याची शक्यता. त्यामुळेच शासकीय कर्करोग उपचार व संशोधन केंद्रात कमालीची शांतता, अंगावर येणारी!
हे सारे असे कसे?.. उत्तर प्रशासकीय पातळीवर लालफितीत अडकलेले! यंत्रसामग्रीसाठी १७ कोटींची गरज १७ लाखांवर आणली गेली. आजही ३५९ पैकी केवळ १३२ पदेच भरलेली. निधीसाठीची मारामार नि औषधांचे व्यवहार उधारीवर. गेल्या तीन महिन्यांपासून वातावरण सारखेच. महिनाभराने फरक पडेल, असा दावा. वातावरण अवसान गळालेल्या यंत्रणेचे!
तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री विजय गावित यांच्या हस्ते थाटात सुरू केलेल्या या रुग्णालयात उपचार होतील का, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनालाही देता येत नाही. रुग्णालयासाठी अजून स्वतंत्र निधी देण्याची व्यवस्थाच झाली नाही. यंत्रसामग्रीसाठी पूर्वी १७ कोटींची यादी केलेली. पैसे मिळाले नाहीत. मग कामापुरते भागवता यावे, एवढय़ाच यंत्रांसाठी किमान कोटी नाही तर लाखाच्या घरात तरी निधी मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली. तो निधी मिळाला नाही. कधी मिळेल ते सांगता येत नाही. सरकारी अजस्र यंत्रणा पत्नी सुपदाबाईला जिभेच्या कर्करोगातून बाहेर काढेल का, हे जसे बळीराम जाधव यांना माहीत नाही तसेच ते सरकारी यंत्रणेलाही ठाऊक नाही. मजुरी करून पोट भरणाऱ्या बळीराम यांच्या पत्नीच्या तोंडात काही दिवसांपूर्वी गाठ आली. जवळच्या डॉक्टरांना त्यांनी दाखविले. पण आजार बळावत गेला. कर्करोग झाल्याचे कळले आणि पत्नीच्या आजारपणासाठी जीवनदायी योजनेत कोणीतरी नाव दाखल केले, तेव्हापासून त्यांच्या औरंगाबादला चकरा सुरू झाल्या. दिवसभरात या रुग्णालयात आता १०० ते १५० रुग्णांवर बाहय़ विभागात उपचार केले जातात, पण शस्त्रक्रिया होत नाहीत. कारण यंत्रणाच कार्यान्वित नाही. येत्या काही दिवसांत ही सेवा सुरू होईल, असे सांगितले जाते. दोन वार्डात रुग्णांना दाखल करून एक शस्त्रक्रिया दालन सुरू होईल, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. पण तीन महिने मोठय़ा इमारतीत उपचार मात्र फारसे होत नाहीत. लिनियर एक्सलेटर, ब्रँकीथेरपी, सेंट्रल ऑक्सिजनची सुविधाही लवकरच सुरू होईल, असे अधिकारी सांगतात. पण आवश्यक ती पदे न भरल्याने नव्याच समस्यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे. वैद्यकीय शिक्षण आरोग्य विभाग यांच्या वतीने जीवनदायी योजनेतून कर्करुग्णांना दिली जाणारी रक्कमही अडकलेलीच आहे. परिणामी कर्करोग उपचार व संशोधन केंद्राला मृत्यूच्या सावलीने घेरले आहे.