अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी १७५ मतदार निवडता यावेत, म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेची बैठक रविवारी (दि. २१) होत आहे. मतदार निवडीच्या या कार्यक्रमात कोणताही आक्षेप येऊ नये, म्हणून कार्यकारिणीच्या बैठकीत ७ वर्षांपूर्वीचा घटनादुरुस्तीचा व मागील काही वर्षांत न झालेल्या सर्वसाधारण सभेचा विषयही नव्याने चर्चेत घेण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची मुदत संपून दीड वर्ष झाले. तथापि, घटनादुरुस्तीच्या नावाखाली निवडणुका घेण्याऐवजी त्या लांबवण्यातच पदाधिकाऱ्यांनी धन्यता मानली. मसापच्या या बैठकीत बरेच काही ठरेल, असा दावा अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला.
मराठवाडा साहित्य परिषदेचा कारभार कासवगतीने हाकला जातो. मराठवाडा साहित्य परिषदेचे २ हजार ३८० सदस्य आहेत. मात्र, या सदस्यांची सर्वसाधारण सभा गेली ७ वष्रे झालीच नाही. मराठवाडा साहित्य परिषदेच्या घटनादुरुस्तीचे काम २००७ पासून रेंगाळले आहे. आजीवन सदस्यत्वासाठी वार्षिक शुल्क ५ हजार रुपये करावे, असा प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी आणला गेला. त्याला विरोध करण्यात आला. सर्वसाधारण सभेत तेव्हा आक्षेप घेण्यात आले. तत्पूर्वी घटना कशी असावी व त्यात कोणत्या दुरुस्त्या कराव्यात, याची शिफारस माजी न्यायमूर्ती भालचंद्र धसगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केली होती. घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने काही आक्षेप आले व पदाधिकाऱ्यांनी हा विषयच गुंडाळून ठेवला.
दरम्यान, कार्यकारिणीची, तसेच विश्वस्त मंडळाचीही मुदत संपली. घटनादुरुस्ती अजून बाकी आहे, या सबबीखाली निवडणुकाही लांबविल्या गेल्या. आता अखिल भारतीय साहित्य संमेलनात मतदार ठरवायचे असल्याने पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा आणि घटनादुरुस्तीच्या विषयासाठी बैठक घेतली जाणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीत २५ सदस्य आहेत. त्यातील २१ सदस्य निवडून यावेत, असे अभिप्रेत आहे. नव्याने घटनादुरुस्तीतही ही बाब समाविष्ट आहे.
मात्र, निवडणुकांऐवजी मागच्या दाराने सदस्यत्व देण्यातच पदाधिकाऱ्यांनी धन्यता मानली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदार ठरविण्याची गुरुकिल्ली आपल्या हातात असावी, या साठी बैठकीचे आयोजन केले आहे.
तब्बल ६ वर्षांपूर्वी थांबविलेल्या घटनादुरुस्तीचा विषयही चर्चेत येणार आहे. गेल्या ६ वर्षांत विश्व साहित्य संमेलनाच्या राडय़ात पदाधिकारी अडकले होते. त्यामुळे घटनादुरुस्तीचे काम रेंगाळले, अशी कबुली मसापचे सचिव के. एस. अतकरे यांनी दिली.

ठाले पाटील यांच्या ‘हो’ला ‘हो’
मसापचे अध्यक्ष ठाले पाटील यांच्या ‘हो’ला ‘हो’ मिळविणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही सर्वसाधारण सभा, घटनादुरुस्ती या विषयांच्या अनुषंगाने कधीही ब्र काढला नाही. महामंडळावर जाण्याची हौस आणि विश्व साहित्य संमेलनात मिरविण्याचा सोस असणारे मसापचे अध्यक्ष ठाले पाटील आणि त्याच्या समर्थकांनी नवी कार्यकारिणी केव्हा होणार हे अजून गुलदस्त्यातच ठेवले आहे. मसापची घटनादुरुस्ती ६ वर्षांपासून सुरूच आहे. ती कदाचित क्लिष्ट असावी, अशी चर्चा उपरोधाने साहित्य वर्तुळात होते.

Story img Loader