मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला शनिवारी (दि. १४) येथे प्रारंभ होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात नामवंत साहित्यिक, लेखक व पत्रकार सहभागी होणार आहेत. संमेलनाला १ हजार २०० शेतकरी प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष रवींद्र तहकीक यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मसाप नांदेड शाखेतील अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, बापू दासरी, निर्मलकुमार सूर्यवंशी, आशा पैठण, प्रा. महेश मोरे, प्राचार्य गणेश जोशी यांची या वेळी उपस्थिती होती. गुरुवर्य नरहर कुरुंदकर नगरी, महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय, विमानतळ रोड येथे या संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता आय.टी.आय. येथील महात्मा फुले पुतळ्यापासून ग्रंथदिंडी निघेल. ग्रंथदिंडीत १२ बैलगाडय़ा, पारंपरिक वेशात महिला, वारकरी, भजनी मंडळ, साहित्यिक सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे, तर ११ वाजता न्या. बी. एन. देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष कमलकिशोर कदम यांची या वेळी उपस्थिती असेल.
दुपारी ३ वाजता ‘शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत लेखक आणि प्रसारमाध्यमांची जबाबदारी’ या विषयावर अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात यमाजी मालकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रा. जयदेव डोळे, प्रा. शंभुनाथ कहाळेकर, शेषराव मोहिते, रमाकांत कुलकर्णी, संजय वरकड, धनंजय लांबे सहभागी होतील.
सायंकाळी ५ वाजता ‘व्हॉट्स अॅप मराठी’ या विषयावर कमलाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात प्रमोद माने, केशव खटिंग, पी. विठ्ठल, कैलास इंगळे, गणेश मोहिते, अनंत राऊत, पृथ्वीराज तौर सहभाग घेतील. सायंकाळी साडेसहा वाजता मराठवाडय़ातील लोककलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम, तर रात्री ८ वाजता मधू जामकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता आसाराम लोमटे यांची रामचंद्र काळुंखे व श्रीधर नांदेडकर प्रकट मुलाखत घेतील. सकाळी ११ वाजता संतांच्या चरित्रकथा व संत साहित्यातील प्रतिमा, प्रतीके, मिथकांचा नव्याने अन्वयार्थ लावणे आवश्यक या विषयावर डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात निवृत्तीमहाराज (देशमुख) इंदोरीकर, रवींद्र तहकीक, मार्तंड कुलकर्णी, भास्कर ब्रह्मनाथकर, विजयकुमार फड व सुशील कुलकर्णी सहभागी होतील. दुपारी २ वाजता अभिनेत्री मधू कांबीकर यांची प्रदीफ निफाडकर ‘प्रवास एक लावण्याचा’ या विषयावर प्रकट मुलाखत, दुपारी साडेतीन वाजता ग. पी. मनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होईल. सायंकाळी ५ वाजता समारोप व खुले अधिवेशन होईल. साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष गजमल माळी, प्रभाकर मांडे, डॉ. यु. म. पठाण, निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, ना. धों. महानोर, लक्ष्मीकांत तांबोळी, सुधीर रसाळ, रा. रं. बोराडे, तु. शं. कुळकर्णी, गंगाधर पानतावणे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, भालचंद्र देशपांडे, बाळकृष्ण कवठेकर, फ. मुं. शिंदे, भास्कर चंदनशिव, बाबा भांड व ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे, भुजंग वाडीकर, स. दि. महाजन, दत्ता भगत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी संमेलनात चर्चा व्हावी, असे रवींद्र तहकीक यांनी सांगितले. संमेलनस्थळी जाण्यासाठी महिला व बाहेरगावच्या शेतकऱ्यांसाठी मोफत बसची सुविधा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा