नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर आणि पदविका विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी दि. २० मार्च रोजी मेगा जॉब फेअरचे म्हणजेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित २० कंपन्यांचा सहभाग होणार आहे. तसेच आयटी फार्मा व इतरही विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. या वार्ताहर बैठकीला त्यांच्या समवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची उपस्थिती होती.

डॉ. मनोहर चासकर म्हणाले, गेल्या एका वर्षात मी या विद्यापीठाचा आणि येथील विद्यार्थ्यांचा, प्राध्यापकांचा, अभ्यासक्रमांचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामध्ये मला असे आढळले की, आपले विद्यार्थी ज्ञानाने परिपूर्ण आहेत, गरज आहे ती त्यांना थोडे पॉलीश करण्याची त्यासाठी मी यापुढे अनेक पुढील कार्यक्रम हाती घेऊन राबविणार आहे.

लर्निंग मॅनेजमेंटची अंमलबजावणी करण्यासाठी अध्ययन आणि अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढेल याकडे लक्ष देणार आहे. केंद्रीकृत डिजिटल व्यासपीठामध्ये अभ्यासाचे साहित्य, असाइनमेंट, प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करून देण्यात येतील. प्रगत अशा अमेरिका व चीन यांच्याशी सामंजस्य करार करून त्यांचा अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदिवासींच्या व्यवसायांना चालना देऊन पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात विद्यापीठाला ९१६ संशोधनपत्रे, ४० प्रकल्प, व ४४ पेटंट मिळाले आहेत. याबाबत यमनच्या राजदूतावासाकडून विद्यापीठाच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली आहे.

इंटरप्रेथॉन २०२५ द्वारे २७ मार्च रोजी स्टार्टअप साठी  हॅकॅथॉन चे आयोजन करण्यात येणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांना स्टार्टअप ची जोड देऊन कृषी ही व्यवसाय आणि वैद्यकीय पर्यटनास चालना देण्यात येणार आहे. न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स या अभ्यासक्रमाचा शुभारंभ १९ सप्टेंबर २०२४ रोजी झाला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना संतुलित आहार व पोषण तत्त्वाचे महत्व कळणार आहे.

दिवसेंदिवस सायबर क्राईम वाढत आहे. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने सायबर सेक्युरिटी हा कोर्स अनिवार्य केला आहे. यासाठी विद्यापीठाने पुणे येथील स्किल फॅक्टरी लिमिटेड यांच्या प्रणालीसोबत करार करून सर्व टेक्निकल व नॉनटेक्निकल विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम देण्यात येणार आहे. ब्युटी आणि कॉस्मेटिक प्रशिक्षण, मोबाईल रिपेरिंग प्रशिक्षण, चित्रपट अभिनय प्रशिक्षण, स्मार्ट फोन मेकिंग प्रशिक्षण इत्यादी सारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देऊन शिक्षण घेत असतानाच त्यांना स्वतःच्या पायावर कसे उभा राहता येईल, यावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लक्ष केंद्रित करणार आहे. शेवटी त्यांनी पुणे- मुंबई येथील विद्यार्थ्यांशी आपली स्पर्धा आहे आणि आपले विद्यार्थी त्यासाठी कुठेच कमी पडता कामा नये अशी भावना व्यक्त केली.

Story img Loader