भाषेचा विषय आला की मराठीचा उपयोग इंग्रजी व िहदीस बहिष्कृत करण्यासाठी होतो. फाजील भाषा भांडणे वा मातृभाषेची कळकळ दाखवणे सोडून या निरुत्पादक चर्चा त्वरित थांबवल्या पाहिजेत. उलट भाषेने सर्वसमावेशक राहून इतर भाषांमधील रुळलेले शब्द विशिष्ट अर्थासह स्वीकारल्याने भाषा समृद्ध होते, असे प्रतिपादन डॉ. छाया महाजन यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे येथे आयोजित सहाव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. डॉ. महाजन यांनी सांगितले की, आपली भाषा आपला प्रांत, देशाला बांधून ठेवणारी नाळ असते. आपली मने तिच्याशी जुळलेली असतात. भाषा संस्कार व संस्कृतीशी बांधून ठेवणारी असते. मी इंग्रजीत का लिहीत नाही, असे अनेकजण विचारतात. परंतु माझ्या अंतकरणातून ती भाषा उमलली नाही, परंतु ती भाषा समृद्ध आहे. सध्या मराठीच नव्हे, तर सर्व भारतीय भाषांसमोर इंग्रजी प्रश्नरूपाने उभी आहे. तिला शत्रूसारखे मानले जाते. भारतात द्विभाषिकच नव्हे, तर बहुभाषिक लेखक आहेत. मराठीत लिहिले तर अस्सल आणि इंग्रजी लिहिले तर खोटे होते काय? इंग्रजी साम्राज्य अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका अनेक बेटांमध्ये होते. तेथे ही भाषा टिकली आणि तिला आपोआप महत्त्व आले. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. आपण ज्या वातावरणात वाढतो त्याचा परिणाम भाषेवर आपोआप होतो.
नवीन मराठी शाळा चालू न करण्याचा सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे, असे सांगून डॉ. महाजन म्हणाल्या की, त्यामुळे भाषेच्या नाळेवरच आघात होईल. परंतु या निर्णयाविरोधात किती मराठी भाषिक उभे ठाकले, हा प्रश्न आहे. मराठीच्या भवितव्याची चिंता वाहणाऱ्यांची मुले इंग्रजी शाळांमध्ये जाताना दिसतात. प्रथम भाषा म्हणून सोडाच, परंतु तृतीय भाषा म्हणूनही मराठीचा आग्रह धरला जात नाही. सध्या आरोग्य, विज्ञान, कृषी, पर्यटन आदी माहितीपर साहित्य पुस्तकांच्या स्वरूपात येत आहे. यात वाङ्मयीन साहित्य अंग चोरून उभे आहे. वाङ्मय रूची व वाङ्मय दर्जाचे प्रश्न भेडसावत आहेत. वाचन संस्कृतीची घसरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मोबाईल, व्हॉटसअॅपवरील संदेश, संगणक ई-मेल यातून नवीनच लिखित भाषा तयार होत आहे.
डॉ. महाजन यांनी मराठवाडय़ातील मराठी भाषेमधील महिला साहित्यिकांच्या लेखनाचा आढावा घेतला. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शकुंतला कदम, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले, संमेलनाच्या उद्घाटक डॉ. संध्या दुधगावकर, मावळत्या अध्यक्षा ललिता गादगे यांची भाषणे झाली. सीमा खोतकर, मनीषा टोपे, निर्मला दानवे, मसापचे कार्याध्यक्ष कुंडलिक अतकरे, प्रा. नरहर कदम, मसाप जालना शाखेचे अध्यक्ष प्रा. जयराम खेडेकर, उपाध्यक्ष अॅड. विनायक चिटणीस आदींची उपस्थिती होती.
आद्यकवयित्री महदंबेच्या गावावरून वाद
मराठीतील आद्यकवयित्री महदंबा जालना जिल्हय़ातील होती, असा उल्लेख संमेलनाच्या कार्यवाह संजीवनी तडेगावकर यांनी प्रास्ताविकात केला. परंतु कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्हय़ातील नव्हे, तर औरंगाबाद जिल्हय़ातील पठण येथील असल्याचे सांगितले. डॉ. महाजन यांनी मात्र महानुभाव पंथातील महदंबा ही आद्यकवयित्री मानली जाते, असे सांगून ती कोणत्या जिल्हय़ातील होती याचा उल्लेख केला नाही. अध्यक्षीय भाषण संपताना सभागृहात उपस्थित महदंबा मासिकाचे कार्यकारी संपादक उद्धवराज प्रज्ञासागर उभे राहिले आणि महदंबा जालना जिल्हय़ातील रामसगावची असल्याचे सांगितले. संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी मात्र महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.
घुमान साहित्य संमेलनास दुपटीहून अधिक साहित्यप्रेमी
वार्ताहर, नांदेड
महाराष्ट्र व पंजाबचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक संबंध आहेत. संत नामदेव महाराजांची कर्मभूमी पंजाबमधील घुमान येथे आहे. हेच औचित्य साधून अ. भा. मराठी साहित्य संमेलन घुमान येथे आयोजित केले आहे. संमेलनास साहित्यप्रेमींनी यावे, असे निमंत्रण महामंडळाचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीतून नांदेडकरांना दिले. दरम्यान, घुमान दूर अंतरावर असल्याने संमेलनास २ हजारांच्या जवळपास साहित्यप्रेमी येतील, असा आधीचा अंदाज होता. परंतु हा प्रतिसाद वाढतच असून ४ हजारांवर साहित्यप्रेमी येतील, असे दिसते.
जेमतेम २५ हजार वस्तीचे हे लहान गाव असले, तरी येथील माणसे मनाने मोठी आहेत. घुमानबाहेरून येणाऱ्या साहित्यप्रेमींची पाहुण्यासारखी बडदास्त ठेवण्याचे आश्वासन तेथील सरपंचाने पुणे येथे येऊन दिल्याचेही पायगुडे यांनी नमूद केले. सातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील संत नामदेव महाराजांनी घुमान हे गाव वसवले. तेथे त्यांनी २४ वर्षे वास्तव्य केले. ८८ व्या साहित्य संमेलनासाठी जी निमंत्रणे आली, त्यात घुमानचाही समावेश होता. महाराष्ट्र व पंजाबचे ऐतिहासिक काळापासून चांगले संबंध आहेत. संत नामदेवांच्या रचना गुरू ग्रंथसाहिबमध्ये आहेत, तर शिखांचे दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंघजी महाराजांची कर्मभूमी व तख्त सचखंड गुरुद्वारा नांदेड येथे आहे. या सर्व बाबींचा विचार करून घुमान येथे संमेलन भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन या पारंपरिक कार्यक्रमांबरोबर या वर्षी साहित्य संमेलनात अभिरूप न्यायालय हे नवे व्यासपीठ असून, या माध्यमातून मराठी साहित्याबद्दल पंजाबी साहित्यिकांना काय वाटते आणि पंजाबी साहित्याबद्दल मराठी साहित्यिकांची काय मते आहेत, यावर येथे चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. महाराष्ट्र-पंजाब संस्कृतीचे दर्शन साहित्यप्रेमींना घडवण्याचाही संयोजकांचा प्रयत्न आहे. हे संमेलन ऐतिहासिक ठरावे, या साठी महामंडळ प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
संत नामदेव हे भागवत व वारकरी संप्रदायाचे असल्याने नांदेड येथील नानकसाई फाऊंडेशनने सर्वप्रथम दिंडीचा प्रस्ताव महामंडळाकडे दिला होता. त्यानुसार ३१ मार्चला नांदेड येथील गुरुद्वारापासून दिंडीला आरंभ होणार आहे. सचखंड एक्स्प्रेसने ही दिंडी निघणार असून पंजाब व महाराष्ट्रातील ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने दिंडी काढण्यात येत असल्याचे पायगुडे यांनी सांगितले. भक्त नामदेव ग्रंथदिंडी आणि नानकसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, मसाप नांदेड शाखाध्यक्ष डॉ. जगदीश कदम, जयप्रकाश सुरनर, सुभाष बल्लेवार, तुळशीदास भुसेवार, जयप्रकाश नागला, नारायण मंजुवाले आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा