लोकसत्ता वार्ताहर

परभणी : भंगार वेचण्याचे काम करणाऱ्या शहरातील एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पंधरा दिवसांपूर्वी अत्याचार झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाने याप्रकरणी योग्य ती कारवाई केली नाही असा आरोप करत याप्रकरणी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. आज सोमवारी (दि.१०) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.

येथील लहुजी नगरातून या मोर्चास प्रारंभ झाला. मोठा मारोती मंदिर, शाही मस्जिद या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात या मोर्चाचे विसर्जन झाल्यानंतर पार पडलेल्या सभेत अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संतप्त घोषणाबाजी करत यावेळी मोर्चेकर्‍यांनी काळे झेंडे फडकवले तर अनेकांच्या हातात वेगवेगळे फलक होते. या फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

मोर्चातील संतप्त नागरीकांनी यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित पिडीतेवर घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या प्रकरणाचा यावेळी विविध वक्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. मोठ्या शहरात घडलेल्या घटनेतील आरोपी तात्काळ पकडले जातात. त्यांच्यावर कारवाई होते पण एका गरीब मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात प्रशासनाकडून गांभीर्य दाखवले जात नाही अशी टीका यावेळी करण्यात आली.

दरम्यान, मोर्चानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. संबंधित मुलीवरील अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, आरोपीची संख्या दहा-बारा असताना दोनच गुंडांना आरोपी केले आहे उर्वरित गुंडांना गुन्ह्यात घ्यावे, आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी, पिडीत परिवाराला शासनाने दहा लक्ष रुपये मदत देवून परिवाराचे पुनर्वसन करावे आदी मागण्या यावेळी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या.

Story img Loader