वाई: जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आज मंगळवारी सकाळी वाईहुन साताऱ्याकडे शेकडो कार्यकर्त्यांचा पायी निघालेला मोर्चा पुणे बंगळूर महामार्गावर पाचवड येथे प्रशासनाकडून अडविण्यात आला.यामुळे मोर्चेकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते.तेथे शासनाला निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चा संघटनेचा वाई ते सातारा पायी मोर्चा काढण्यात आला होता. रायरेश्वर वरून आलेल्या क्रांती ज्योतीचे स्वागत करून श्री महागणपती व श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री महागणपतीची आरती करून गणपती घाटावरून सातारा कडे मोर्चास प्रारंभ झाला.
हेही वाचा >>> मराठा आरक्षण कसं मिळेल? शरद पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग, म्हणाले..
वाई ते सातारा पायी मोर्चेचा मार्ग गणपती घाट बावधन ओढा कडेगाव पाचवड उडतारे लिंबफाटा वाढे सदरबाजार जिल्हाधिकार्यालय असा आहे. या मार्गावरील सर्व गावातील मराठा बांधवानी सहभागी होऊन लाखोंच्या संख्यानी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले होते. या मोर्चासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार,सुधीर वाळुंज,बिपीन चव्हाण आदी अनेक अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. या मोर्चात सर्व समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा >>> “कुणबी जात प्रमाणपत्र चॅलेंज करता येत नाही, त्यामुळे…” काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा समाजाचा वाई ते सातारा निघालेला मोर्चा पोलिसांनी पुणे बंगळूर महामार्गावर पाचवड येथे अडवला,यामुळे मोर्चेकरी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी आक्रमक झाले होते. मात्र पाचवड ( ता वाई) येथे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी समन्वयकांशी चर्चा केली.तेथे शासनाला युवक युवतींच्या हस्ते निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला.अनेक अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.