सांंगली : दुष्काळी स्थिती असल्याने सांगलीला हक्काचे आणि नियमित पाणी मिळावे या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. माजी राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील काही तालुययाना हक्काचे पाणी मिळण्यासाठी आमदार डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या मोर्चाच्या माध्यमातून म्हैसाळ, आरफळ, टेंभू व ताकारी पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन सुरू करुन त्यात सातत्य ठेवावे. चालू लोकसंख्या गृहीत धरून जिल्ह्यात दुष्काळी भागात मुबलक पाणी पुरवठा आवश्यक तेवढ्या टँकरद्वारे करावा. ढाणेवाडीची पाणी पुरवठा योजना व शेतीसाठी पाणी पुरवठा करावा. पलूस तालुययात कृष्णा कालव्याचे आवर्तन सुरू करणे व आरफळ योजनेतून तात्काळ पाणी मिळावे तसेच जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ व जेथे चारा टंचाई निर्माण झाली आहे अशा ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. म्हैसाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त ठेवावे, विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे, सांगली महापालिका क्षेत्रात शुध्द व मुबलक पाणी पुरवठा करावा, कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वहाती ठेवावी व पाणी उपसा बंदी लागू करु नये अशा अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या.
फोटो- पाण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.