खारेपाट विभागातील ४५ गावे आणि १२ आदिवासी वाडय़ांना गेल्या तीन दशकांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. मात्र राजकीय पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणा याबाबत उदासीन आहे. खारेपाट विभागातील या पाणी समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पेण ते अलिबाग मोटरसायकल रॅली काढून शासनाच्या उदासीनतेचा निषेध केला. यात डोक्यावर हंडे घेऊन महिलादेखील मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.
पेण तालुक्यातील कोळवे, बेणेघाट, िशगवट, बोरी, सिर्की, बोर्वे, बेडी यासह २५ गावे व वाडय़ा पाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत. पाण्यामुळे संतप्त झालेले गावकरी व महिला आपल्या डोक्यावर हंडा घेऊन अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. हेटवणे धरण पेण तालुक्यात आहे. मात्र त्याचे पाणी नवी मुंबईला पुरवले जाते स्थानिक मात्र पाण्यापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. याबद्दल महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हेटवणेचं पाणी पहिलं पेण तालुक्याला मिळालं पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली
पेण तालुक्यात शहापाडा हेटवणे ही दोन मोठी धरणे आहेत. त्याचबरोबर बाळगंगा धरणही प्रस्तावित करण्यात आले आहे. हेटवणे व शहापाडा या धरणातून यापूर्वी पेण तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जात असायचा. त्यानंतर वाढती लोकसंख्या व पाणी टंचाईची समस्या जाणून घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९९८ साली शहापाडा धरणाचे उत्तर प्रादेशिक व दक्षिण प्रादेशिक असे दोन भाग केले. यामुळे सध्या पेण खारेपाटवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण सहापाडा योजनेत कोलेटी ते शिर्की चाळ परिसरातील ४२ गावे व २८ वाडय़ाचा समावेश असून जलशुद्धीकरण केंद्राबरोबर आमटेम, देवळी, कारावी, वडखळ व शिर्की येथे साठवण टाक्या बांधण्यात आल्या. परंतु गेल्या १७ वर्षांपासून ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली असून महिला वर्गाला रात्रीचा दिवस करून मल न् मल पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यासंदर्भात शुक्रवारी शासनाला जाब विचारण्यात आला. या मोर्चात रायगड जिल्ह्य़ातील पत्रकारही मोठय़ा संख्येनी सहभागी झाले होते.