सांगली : शासकीय नोकर्‍यांचे कंत्राटीकरण करण्याच्या विरोधात ओबीसी, व्हीजीएनटी बहुजन परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर उंटासह मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व बहुजन परिषदेचे राज्य सरचिटणीस संग्रामनाना माने आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी केले.

शिक्षण, आरोग्य, परिवहन व वीज महामंडळातील सेवा आता खासगी कंपन्यांच्या ताब्यात कंत्राटी पध्दतीने देण्याचे धोरण शिंदे सरकारने सुरू केले आहे. १२ कोटींच्या महाराष्ट्रात हजारो तरूण बेरोजगार असताना नोकर्‍यांचे कंत्राटीकरण करून केवळ नउ कंपन्यांच्या हाती सगळा कारभार सोपविण्याचा शासनाचा प्रयत्न असून यामुळे लाखो रूपये खर्च करून शिक्षण घेत असलेली तरूण पिढी नैराश्याच्या गर्तेत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे गुणवंत तरूणांवर अन्याय होणार असून याचा शासनाने फेरविचार करून शासकीय नोकरभरती शासनामार्फतच करावी अशी मागणी मोर्चाच्यावतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली असल्याचे माने यांनी सांगितले.

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, छ. संभाजीनगरमध्ये टेम्पो ट्रॅव्हरलची ट्रकला धडक, १२ ठार, २३ जखमी

वालचंद महाविद्यालयापासून हलगी वाजवत उंटासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो तरूण हातात फलक घेउन सहभागी झाले होते. मोर्चाच्यावतीने निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

Story img Loader