लोकसत्ता वार्ताहर
परभणी : येथील रेल्वेस्थानकासमोर गांजाचा साठा घेवून उभ्या असणार्या दोघा व्यक्तींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३२ किलो २०० ग्राम गांजा जप्त केला. या जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे ६ लाख ४ हजार रुपये एवढी आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू मुत्तेपोड, पोलिस उपनिरीक्षक चंदन परिहार व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहिती नुसार, रेल्वेस्थानकासमोर काही व्यक्ती गांजा विक्री आणि वाहतूकीसाठी ताब्यात बाळगून आहेत याची माहिती मिळाली. यासंदर्भात खात्री पटल्यानंतर पथकाने शेख अकबर शेख जाफर (रा. परतूर) व सुनील सुंदर हरिजन (रा.ओरिसा) यास ताब्यात घेतले व त्यांच्याकडून ३२.२०० किलो ग्राम गांजा जप्त केला. त्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार या पथकाने शेख कलीम शेख जहूर (रा. परतूर) याचा मानवतकडे पाठलाग केला व त्यासही ताब्यात घेतले. दरम्यान या तीन आरोपींविरोधात पोलिसांनी एनडीपीएस कायद्याप्रमाणे नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आज सायंकाळी सुरु होती.