सांगली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अमेरिकेतील शेतमाल आपल्या बाजारात येऊ शकेल काय, अशी भीती निर्माण झाली असून, अशा वेळी बाजार समित्यांची जबाबदारी वाढणार आहे. समित्यांनी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी समिती संचालकांनी आदर्शवत ठरलेल्या बाजार समितीतून माहिती घेऊन वाटचाल करावी, असे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले.

इस्लामपूर येथील बाजार समितीच्या इमारत नूतनीकरण व श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील फळे व भाजीपाला मार्केटमधील नवीन व्यापारी गाळ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंग नाईक, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष श्याम पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आदी उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, की ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेतील शेतमाल आपल्याकडे येईल काय, अशी भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेत जाणाऱ्या मालावर मोठ्या प्रमाणात कर लावला जात आहे. यामुळे शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. याचा परिणाम बाजार समितीवर होऊ शकतो. तालुक्यातील महिला बचत गटाने तयार केलेला माल ठेवण्याची आपल्याकडे व्यवस्था करायला हवी.

बाजार समितीचे सभापती संदीप पाटील यांनी, प्रास्ताविकात समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप व औषध दुकाने सुरू करणार असल्याचे सांगितले. या वेळी माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील, माजी सभापती पै. अप्पासाहेब कदम, शहाजी पाटील, संजयबापू पाटील यांच्यासह बाजार समितीचे संचालक, राजारामबापू उद्योगसमूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.