सांगली : दख्खन जत्रेच्या माध्यमातून स्वयंसाहाय्यता बचत गटांतील महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळाली असून, या माध्यमातून स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
दख्खन जत्रा २०२५ अंतर्गत महिला स्वयंसाहाय्यता बचत गटांच्या वस्तूंचे व ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादनांच्या विभागस्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (विकास) विजय मुळीक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला भगिनी व त्यांचे कुटुंबीय यांचे आयुष्य सुकर व्हावे, यासाठी प्रयत्नरत असून विविध कंपन्यांच्या माध्यमातून गृहिणींना दुपारी मिळणाऱ्या वेळेत काम उपलब्ध करून देण्यासाठी काही कंपन्यांनी सहमती दर्शवली आहे. त्याचबरोबर महिलांना बँकेचे व्यवहार कळावेत, यासाठीही काम करत असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री पाटील यांनी प्रदर्शनातील काही स्टॉलवर जाऊन महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधला. अडीअडचणी समजून घेण्याबरोबरच सहभागी महिला बचत गटाच्या प्रत्येक स्टॉलवरून प्रत्येकी ५०० रुपयांची खरेदी करण्यासाठी ६५ हजारांचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्याकडे दिला.
सांगलीतील दख्खन जत्रेचे प्रदर्शन दि. २१ मार्चअखेर चालणार असून यामध्ये सांगलीसह सातारा, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील बचत गटांचे व गावरान खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.