पातूर येथे छेड काढणाऱ्या विकास नागे या युवकाला युवतीने व जमावाने चांगलेच चोपले. त्याला अटक केल्यानंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात युवतीने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शनिवारी बाळापूर रोडवर एका दुकानासमोर सायंकाळी एका २० वर्षीय विवाहितेला छेडण्याचा प्रयत्न झाला, पण हा प्रयत्न तीने धाडसाने परतवून लावला. या वेळी छेड काढणाऱ्या युवकाला युवतीने चांगलाच चोप दिला, तसेच जमावाने त्याला चांगलेच फटकारले. या संदर्भातील तक्रार युवतीने पातूर पोलिसात केली. पोलिसांनी तात्काळ विकास नागेला व अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोलिसांनी युवतीचा विनयभंग करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती आज पातूर पोलिसांनी दिली.  महिलांची छेड काढणाऱ्या युवकांना चोप देऊन त्यांना वठणीवर आणण्याचा या युवतीचा प्रयत्न जमावाच्या मदतीने यशस्वी झाला. पातूर येथे झालेल्या या घटनेमुळे ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेचा विषय समोर आला आहे.