सोलापूर: नणंदेच्या मुलाला दत्तक घेण्यासाठी सासरी वाढलेला दबाव आणि त्यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेस गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासूसह नणंद आणि नणंदेचा मुलगा अशा तिघांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रूक येथे ही घटना घडली. अनिता हणमंत मोहिते (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सासू शांताबाई तुकाराम मोहिते ( वय ५६, रा. सलगर बुद्रुक ), नणंद बाळाबाई मनोहर गंभीरे (वय ३८) आणि तिचा मुलगा अतुल मनोहर गंभीरे ( वय २१, दोघे रा. जवळा, ता. सांगोला ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात मृत अनिता हिचा भाऊ प्रशांत शंकर लवळे (वय २८, रा. मुढवी, ता. मंगळवेढा ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत अनिता हिचे लग्न झाल्यानंतर तिला बरीच वर्षे मूलबाळ होत नव्हते. मूल होण्यासाठी अनिता व पती हणमंत हे कोल्हापूर येथे उपचार घेत होते. मात्र सासू शांताबाई हिचा उपचार घेण्यास विरोध होता. त्याऐवजी आपल्या नातवाला दत्तक घ्यावे, असा तिचा आग्रह होता. त्यातून अनिता हिच्यावरील उपचार बंद केले होते. सासू शांताबाईसह नणंद बाळाबाई आणि दत्तक जाण्यासाठी तयार झालेला नणंदेचा मुलगा अतुल या तिघांनी अनिता हिच्यावर सतत दबाव आणला. परंतु तशी तिची मानसिकता नसल्यामुळे संतापलेल्या सासू, नणंद व नणंदेच्या मुलाकडून तिचा सतत शारिरिक व मानसिक छळ होऊ लागला. याबाबत मृत अनिता हिने माहेरी संपर्क साधून होणाऱ्या त्रासाबद्दल गाऱ्हाणे मांडले होते. शेवटी तिने सासू, नणंद व तिच्या मुलाच्या त्रासाला आणि दत्तक घेण्यासाठीच्या दबावाला वैतागून सासरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married woman commits suicide due to torture to adopt child in solapur amy
Show comments