मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथील दुर्दैवी घटना

अकोला : बुलढाणा जिल्हय़ाच्या मेहकर तालुक्यातील बाभुळखेड शिवारात एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मनीषा अंकुश गायकवाड (२८), समर्थ अंकुश गायकवाड (८) व युवराज अंकुश गायकवाड (३) असे मृतांची नावे आहेत.

मेहकर तालुक्यातील बाभुळखेड शिवारात अंकुश गायकवाड हा काही वर्षांपासून भाऊराव वानखेडे यांच्या शेतात आपल्या परिवारासह कामाला होता. काही महिन्यापूर्वी अंकुश गायकवाड यांच्या सासूचे निधन झाल्याने त्यांचे सासरे शिवाजीराव बकाल त्यांच्याच सोबत राहत होते. अंकुश व त्याची पत्नी मनीषामध्ये कौटुंबिक वाद होता. आज अंकुश काही कामानिमित्त मूळ गाव असलेल्या देऊळगाव मही येथे गेला होता, तर विवाहितेचे वडील शिवाजीराव बकाल हे सुद्धा वाशीम जिल्हय़ात त्यांच्या गावी गेले होते. कौटुंबिक वादाचा राग मनात ठेवून मनीषा गायकवाड यांनी आपली दोन मुले समर्थ (८) व युवराज (३) यांना घेऊन शेजारील राम पातूरकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या शेतालगतच महामार्गाचे काम करणाऱ्यांनी घटनास्थळावर तात्काळ धाव घेतली. विहीर सुमारे १०० फूट खोल असल्याने शोध कार्यात मोठा अडथळा आला. शेवटी मोटारद्वारे विहिरीतील पाणी काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेमुळे शिवाजीराव बकाल यांना धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. कौटुंबिक वादाच्या कारणावरून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी व्यक्त केला.

Story img Loader