परभणी : मानवत तालुक्यातील मंगरूळ कॅम्प येथील मजुरी करणाऱ्या तरुण विवाहितेवर एक महिन्यापासून लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना मंगळवारी (दि.११) पिडीतेच्या तक्रारीवरून उघड झाली. याबाबत अधिक माहिती अशी, सारंगपूर येथील चंदू कोळी याने पीडित तरुण विवाहितेस तिच्या घरून बळजबरीने पैशाच्या कारणावरून १० जानेवारीला रात्री आठ वाजता पळवून नेले.
सारंगपूर येथील एका शेतात तिच्याविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केला. व याबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल होण्याच्या आठ दिवस अगोदर आरोपी चंदू कोळी याने सदर पिडीतेस वसमत तालुक्यातील मुडी या गावी ऊसतोडीसाठी नेले. तेथे गेल्यानंतर पिडितेने आपला भाऊ व वडीलास फोनवरून झालेल्या घटनेची माहिती दिली. पीडीतेचा भाऊ व वडिलांनी तिची आरोपीकडून सोडवणूक केली व मानवत पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.११) रात्री दहा वाजता आरोपी चंदू कोळी यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली. तक्रारीवरून मानवत पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध लैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीस आज बुधवारी (दि.१२) अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे करीत आहेत.