गेल्या काही दिवसांपासून अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या भरपाईचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. ते अग्निवीर योजनेतून लष्करात दाखल झाले असल्यामुळे त्यांच्या निधनानंतर सेवेतील इतर लाभ त्यांना मिळणार नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यानंतर भारतीय सैन्यदलाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनंही यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
लष्कराकडून अक्षय गवतेंना नुकसान भरपाई
दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराकडून अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना भरपाई स्वरूपात १ कोटी १३ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यात सेवानियमांनुसार नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्स, सेवा निधी, आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युल्टी फंडमधून दिला जाणारा निधी, आर्मी वाईव्ह्ज वेल्फेअर फंडमधून दिला जाणारा निधी अशा एकूण रकमेचा समावेश आहे.
आर्थिक भरपाईच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप
दरम्यान, अक्षय गवतेंच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई दिली जात नसल्याचा दावा करत विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. मु्ख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर जाहीर केल्याप्रमाणे अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला किती भरपाई मिळणार? भारतीय लष्कराने दिली माहिती
“सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षय यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जवान अक्षय गवते हे चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षय यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली”, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नेमकं घडलं काय?
सियाचीनमध्ये कर्तव्यावर तैनात असताना अग्निवीर योजनेतून लष्करात दाखल झालेले अक्षय गवते यांचं निधन झालं. त्यांचं निधन झालं, तेव्हा ते ‘लाईन ऑफ ड्युटी’वर तैनात होते. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी विभागात ते पोस्टिंगवर होते.