मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारा कंटेनर विरुद्ध बाजुच्या लेनवर उलटल्याने पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचालकासह महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर संबंधित कारमधील इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कंटेनर (एमएच-४६, एआर ०१८१) पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात होता. यावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर विरुद्ध लेनवर जाऊन उलटला. यावेळी समोरून येणाऱ्या इतर पाच वाहनं बाधित झाली. यामध्ये एका सुझुकी डिझायर कारचा (एमएच-४८, ए ६५१२) चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात कार चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर दोन महिला जखमी झाल्या. दोन्ही जखमी महिलांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या अपघातानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. या मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू आहे. अपघातग्रस्त वाहनांना घटनास्थळावरून बाजुला केलं जात आहे.