नाशिक साखर कारखान्याचा २०१४-१५ चा गळीत हंगाम सुरू करावा, कामगारांचे थकीत वेतन अदा करावे, भविष्य निर्वाह निधीचा त्वरित भरणा करावा, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी कारखान्यातील कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नासाकातील कामगारांच्या प्रश्नांबाबत सीटूचे डी. एल. कराड, राजू देसले, संघटनेचे विष्णुपंत गायखे, शिवाजी गाडे, शिवराम गायधनी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात कामगार मोठय़ा संख्येने सहभागी झाले. कारखान्यात २०२ कायम, तर १५७ हंगामी असे ३५९ कामगार आहेत. मागील ३८ महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. वेतन व भत्त्यापोटी कारखान्याकडून कामगारांना १२ कोटी ६३ लाख रुपये घेणे आहे. पगाराची मोठी रक्कम थकीत असताना भविष्य निर्वाह निधीची सव्वा कोटीची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली गेली नाही. थकीत वेतनामुळे उपासमारीची वेळ आली आहे, याकडे कामगारांनी लक्ष वेधले. अध्यक्ष देविदास पिंगळे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जादा कर्जाची उचल करून कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा करून ठेवल्याचे संघटनेने म्हटले आहे. हे कर्ज थकल्याने बँकेने कारखान्याला पूर्व हंगामी कर्ज दिले नाही. त्यामुळे कारखान्याचा गळीत हंगाम धोक्यात आला. व्यवस्थापनाने कारखान्याकडे गरजेइतका ऊस शिल्लक नसल्याचे दाखवून कामगारांना आठ महिन्यांसाठी सक्तीने रजेवर पाठविले. प्रत्यक्षात कारखाना कार्यक्षेत्रातून त्यात गळतीसाठी इतर कारखान्यांकडे १.६० लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी गेला. यावरून व्यवस्थापनाने कामगार व सभासदांची दिशाभूल केल्याचे उघड झाल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.
वीज देयक थकल्याने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. कारखाना परिसरात १०० कुटुंबे राहतात. संपूर्ण परिसर अंधारात बुडाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. २०१४-१५ मधील गळीत हंगाम सुरू होतो की नाही, याबद्दल उत्पादक, कामगार यांच्यात साशंकता आहे. हा गळीत हंगाम सुरू करावा, कामगार संघटना आणि जिल्हा बँक पातळीवर झालेल्या करारनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्वरित साखर विक्री करावी, वीज देयकाचा भरणा करून वीज व पाण्याची व्यवस्था करावी, संचालक मंडळाने कारखाना त्वरित सुरू करून समस्या सोडवाव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive sugar workers protest