अलिबाग – रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात माथेरान येथे विक्रमी ३४२ मिलीमीटर पाऊस पडला असून, कर्जत, खालापूर, पोलादपूर आणि पेण येथे २०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत अलिबाग १०२ मिमी, पेण २३५ मिमी, मुरुड ५५ मिमी, पनवेल ११५ मिमी, कर्जत २५२ मिमी, खालापूर २१३ मिमी, सुधागड १६७ मिमी, उरण १६५ मिमी, रोहा ७५ मिमी, माणगाव १२८ मिमी, तळा ९८ मिमी, म्हसळा ९५ मिमी, महाड १९३ मिमी, पोलादपूर २२३ मिमी आणि श्रीवर्धन येथे ५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
किनारपट्टीवरील तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगा लगत असलेल्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सावित्री, अंबा आणि पाताळगंगा नद्यांना पूर आला आहे. कुंडलिका नदीही धोका पातळीच्या जवळून वाहत आहे.
हेही वाचा – उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, काळू नदी इशारा पातळीवर, ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस
महाड शहर, नागोठणे, आपटा, रसायनी, रीस, वाशीवली, खोपोलीतील श्रीरामनगर येथे पूरस्थिती आहे. त्यामुळे नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोधिवली येथे रस्त्यावर पाणी आल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक एका मार्गिकेवर करण्यात आली आहे. पाली खोपोली मार्गावरील वाहतूक पाली येथे पूलावरून पाणी आल्याने थांबविण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पूरस्थितीमुळे या मार्गावर अनेक वाहने अडकून पडली आहेत.